बालशिक्षणाचे शास्त्र, त्याचा व्यवहार व त्याची चळवळ

साधारणपणे सहा वर्षांपर्यंतचे वय हे बालशिक्षणाचे वय मानले जाते. म्हणून भारतात, २००९ सालच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार सहा वर्षे पूर्ण झाल्यावर औपचारिक शालेय शिक्षणाची सुरुवात मानलेली आहे. त्यामुळे, आता, नेमकेपणाने तीन ते सहा हे वय शालेयपूर्व वय म्हणून धरता येईल. या काळात होणारे शिक्षण ते शालेयपूर्व (पूर्वप्राथमिक नव्हे!) शिक्षण होय. पण ते कोणत्याही अर्थाने शालेय-औपचरिक शिक्षणाशी नाते सांगत नसल्यामुळे, या काळातील शिक्षणाला केवळ ‘बालशिक्षण’ म्हणणे युक्त ठरेल.

शालेय शिक्षण हे वाचन-लेखन-गणन या मूलभूत कौशल्यांचे व त्याकरवी विविध विषयांचे शिक्षण घेण्याचे क्षेत्र असते. बालशिक्षणात, या कोणत्याच गोष्टींना स्थान नसते, नसावे लागते. निसर्गाने माणसाला, ज्यांच्या आधारे पुढील जीवन जगायचे असते अशा काही मूलभूत क्षमता बीजरूपाने बहाल केल्या आहेत; या क्षमतांना जागरूक करण्याचे, फुलविण्याचे व विकसित करण्याचे काम बालवयातच व्हावे लागते. त्यामुळे बालवय हे क्षमताविकासाचे वय म्हणून ओळखता येईल. आणि बालशिक्षण म्हणजे क्षमता विकासाचे शिक्षण असे  म्हणता येईल.

प्राथमिक शिक्षण आणि बालशिक्षण यांमधील आणखी एक फरक, बालशिक्षणाचे विज्ञान पाहण्यापूर्वी, लक्षात घेणे शिक्षणव्यवहाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. प्राथमिक – व पुढे माध्यमिक वगैरे – शिक्षण हे काही विषयांचे व त्यातील आशयांचे म्हणजे त्यांतील मध्यवर्ती संज्ञा-संकल्पनांचे शिक्षण असते. संस्कृतीने साठविलेल्या माहितीतील विशिष्ट माहिती विशिष्ट इयत्तांमध्ये द्यायची याचा तार्किक पण सामाजिक निर्णय घेतला गेलेला असतो; व तो जगभर पाळला जातो. बालशिक्षणाचे क्षेत्र हे अशाप्रकारे माहिती पुरविण्याचे क्षेत्र नाही. त्यामळे शालेय शिक्षणातील कोणतेही शालेय साहित्य येथे लागत नाही; किंबहुना त्याला येथे मज्जावच आहे!

अनुभवांचे खाद्य खाऊनच नैसर्गिक क्षमतांचा विकास साधला जातो. असा मेंदूशास्त्राचा दाखला आहे. त्यामुळे बालशिक्षणाचे वय हे सर्वतोपरी विविधांगी अनुभवप्राप्तीचे वय आहे. अनुभवांधारित शिक्षण अशी बालशिक्षणाची नेटकी व्याख्याही आपण करू शकू.

बालशिक्षणाचे वय हे आणखी एका बाबतींत इतर (औपचारिक) नंतरच्या शिक्षणापेक्षा वेगळे आहे. हे वय वेगाने होत जाणाऱ्या मेंदूघडणीचे वय आहे, आणि मेंदू हाच तर आपला शिकण्याचा अवयव आहे. साहजिकच जेव्हा बालकांची मेंदूघडणीची नैसर्गिक प्रक्रिया वेगाने घडत असते, त्या काळात, बालमेंदूची काळजी घेणे हे अपरिहार्यपणे येते. मेंदू वाढीसाठी अनुभवांचे खाद्य पुरवताना ही काळजी घ्यावी लागते. याचा साधा व्यावहारिक नियम असा की, मुलांना विविध अनुभव प्राप्त करून देताना, ते मेंदूवाढीस पोषक, मेंदुवाढीस पूरक, मेंदूवाढीस आवश्यक असे असावे. ते मेंदूविकासास घातक असे असू नये.

बालशिक्षणाचे शास्त्र म्हणजे योग्य अशा अनुभवमांडणीचे शास्त्र असते! अनुभव हे बालशिक्षणात साधनभूत असतात. साध्य असते ते क्षमतांच्या विकासाचे.

बालकांच्या पुढील जीवनाची बांधणी करून देणाऱ्या अशा चार पायाभूत क्षमतांचा विकास बालशिक्षणात अभिप्रेत असतो. एक शारीरिक, दोन भावनिक, तीन, सामाजिक आणि चार, भाषिक क्षमता. यातील पहिल्या दोन ह्या मूलतः वैयक्तिक असून दुसऱ्या दोन, स्वरूपाने सामाजिक आहेत असे म्हणता येईल. या चारही क्षमतांच्या समतोल समन्वयातून बालकांची बौद्धिक क्षमता विकसित होत जातो, जिला पुढील शिक्षणात मानाचे स्थान दिलेले असते.

मानसशास्त्रातील (पियाजेच्या) जीवशास्त्रीय ज्ञाननिर्मिती शास्त्रानुसार, तत्त्व असे आहे की विशिष्ट पातळीची शारीरिक पक्वता आल्याशिवाय त्या पातळीला अपेक्षित असलेला बौद्धिक विकास होत नाही. (याचा व्यत्यास असा की, विशिष्ट शारीरिक परिपक्वतेला विशिष्ट बौद्धिक विकास अपेक्षित असतो) माज्जाश्स्त्रीय संशोधनातून असा नियम पुढे आला आहे की, भावनिक स्थिरता हा बौद्धिक विकासाचा द्वारपाल आहे. भाषा शास्त्राचा असा दावा आहे की भाषा विकास, भाषेची समृद्धी बौद्धिक विकासाला गती देत असते. बौद्धिक पातळीवरील विचारक्षमतेचा विकास साध्य करण्याचे, भाषा हे एक उच्चप्रतीचे मानससाधन आहे असे प्रतिपादन सामाजिक-मानसशास्त्र करते. त्याचप्रमाणे, माणूस इतरांशी होणाऱ्या परस्पर आंतरक्रियांकरवी आपल्या बौद्धिक विकासाला खत-पाणी पुरवीत असतो,असा मानववंशशस्त्राचा दाखला आहे.

पायाभूत क्षमतांच्या विकासाचे बालशिक्षण हे आज, घर, बालशाळा व नजिकचा परिसर अशा तीनही स्थानी, आपसूक मिळालेल्या अनुभवांतून होणारे सहजशिक्षण आणि जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या अनुभवांकरवी अनौपचारिक शिक्षण बालकांना प्राप्त होत असते. बालशिक्षाणाविषयीची आपली सामाजिक जाण मर्यादित असल्यामुळे केवळ ‘बालशाळा’ हेच बालशिक्षणाचे एकमेव स्थान मानून, बालशिक्षणाचा जो काही विचार होतोय तो होतोय.वास्तविक कुटंब ही शास्त्रीय बालाशिक्षणासाठी अत्यंत प्रभावी अशी व्यवस्था आहे.(प्रयोगशाळा आहे!) वस्तू, व्यक्ती, घटना, निसर्ग यांचा सामाजिक परिसर आजपर्यंत शैक्षणिक अंगाने संपूर्णतः दुर्लक्षितच आहे.

स्वातंत्र्याचे व सौहार्दाचे वातावरण, विविधांगी अनुभवांचे उपक्रम आणि आव्हानांचे सुनियोजित तंत्र ही शास्त्रीय बालशिक्षणाची अविभाज्य अंगे आहेत. बालशिक्षणाचे प्रत्यक्ष व्यवहार हे या तीन अंगानी बेतलेले असे असावे लागतात. यांच्या आधारे बालशाळेचा शिक्षणक्रम आखता येतो.

 

बालशिक्षणाशी संबंधित अशा सर्वांच्या नजरेसमोर ‘शास्त्रीय, गुणवत्तापूर्ण शिक्षणा’चा एक ढाचा असला पाहिजे; आणि तो शिकणाऱ्या लहानग्यांच्या नैसर्गिकतेशी मिळता-जुळता असला पाहिजे. हे कसे करावे हे कळण्यासाठी, अत्याधुनिक अशा मज्जा-मानसशास्त्रातील संशोधने आणि त्यांचे शैक्षणिक पर्यवसान यांचा सैद्धांतिक आधार, आपल्याला घेता येईल. अशा सैद्धांतिक अंगाने बालशिक्षणाची रचना ठरविणे ही एक उपयुक्त अशी दिशा आहे. ही दिशा उपयुक्त आहेच, पण ती एकमेव दिशा आहे असे मानण्याचे कारण नाही. दुसरी तेवढीच उपयुक्त आणि तेवढीच प्रभावी दिशाही आहे; आणि ती म्हणजे, शिकणाऱ्या बालकाच्या कौटुंबिक, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्र्वभूमीची. लहान वयांतील मुलांचे घडणे व शिकणे या दोन्हीही प्रक्रिया नैसर्गिकतेइतक्याच त्यांच्या सामाजिकतेशी, सामाजिक अनुभव विश्वाशी संबंधित असतात. यामुळे, सैद्धांतिक आणि सांस्कृतिक अशा दोन्हींचा समन्वय साधून बालशिक्षणाचा विचार करावा लागतो. सैद्धांतिक क्षेत्रातून येणारा विचार हा सहजपणे सार्वत्रिकरित्या स्वीकारला जाऊ शकतो, परंतु संस्कृतीच्या क्षेत्रांतून आलेला विचार हा बहुधा संस्कृतिनिहाय वेगळा असू शकतो. सैद्धांतिक विचार हा बालशिक्षणाची (किंवा अन्य कोणत्याही शिक्षणाची) पायाभूत रचना ठरविण्यासाठी विशेष उपयोगी ठरतो तर संस्कृतिनिहाय विचार हा बालशिक्षणाची व्यावहारिक तत्त्वे ठरविण्यासाठी आणि प्रत्यक्ष व्यवहाराची रचना ठरविण्यासाठी त्या त्या संस्कृतींच्या स्तरांवर, उपयुक्त ठरतो. सैद्धांतिक बालशिक्षणांतून, बालकाची शारीरिक वाढ व त्याच्या मेंद्ची वाढ तसेच  या वाढीचा बालकाच्या नैसर्गिकरित्या शिकण्याच्या प्रक्रियांशी संबंधित अशा बाबींचा, प्रामुख्याने आपल्याला उलगडा होतो; तर बालकाच्या सभोवतालचा छोटासा सांस्कृतिक परिसर, हा बालशाळेतील शिकण्याच्या व्यवहाराला साधनभूत ठरत असतो. या विविध कारणांमुळे, बालशाळेचा शास्त्रीय नि दर्जेदार ढाचा ठरविताना सैद्धांतिक नि सांस्कृतिक दिशांचा समन्वय करून या नमुन्याला पूर्णता आणता येते.

 

बालशिक्षणाची सैद्धांतिक दिशा

पियाजे (१८९६-१९८०) या मानसशास्त्राने मुलांच्या शिकण्याच्या मानस पातळीवरील प्रक्रियांविषयी एक नवी दृष्टि दिली. मुले जग आकळून घेताना, आपल्या भोवतालच्या परिसराचे विश्लेषण करतात, आपल्याला येत असलेल्या अनुभवांचे स्पष्टीकरण करून घेतात आणि यांकरवी, त्यांचा अर्थ लावून आपल्या ज्ञानाची रचना करतात, अशी पियाजेची भूमिका आहे. मात्र ही भूमिका मांडताना, पियाजे  (पियाजे व इनहेल्डर : ‘द सायकॉलॉजी ऑव्ह द चाइल्ड’ (१९६९) आपल्याला बजावून सांगतो की, ज्ञान हे ते घेणाऱ्याकडून येत नाही आणि ते बाह्य जगाकडूनही येत नाही; तर ते येते ते, या दोन्हींच्या आंतरक्रियांतून येते किंवा दोन्हींची एकवाक्यता होऊन, त्यांतून निर्माण होते. रचनावादी शिक्षणातील हा एक पायाभूत विचार आहे.

या विचाराला जोड देणारे विचार वायगोटस्की (१८९६-१९३४) या रशियन मानसशास्त्रज्ञाने मांडले आहेत. त्याच्या मते, ज्ञान किंवा समज ही, शिकणाऱ्याची आजूबाजूच्या समाजाशी जी आंतरक्रिया घडून येते, त्यांतून निर्माण होते. (वायगोटस्की : ‘माईंड इन सोसायटी : द डिव्हलपमेंट ऑव्ह हायर सायकॉलॉजिकल प्रोसेसेस’, १९७८). वायगोटस्कीच्या या विचार प्रवाहाला ‘रचनावादाचे सामाजिक-सांस्कृतिक प्रतिमान’ म्हणून ओळखले जाते. पियाजेचे प्रतिमान आणि वायगोटस्कीचे प्रतिमान यांमधून रचनावादी बालशिक्षणाची पायाभूत बांधणी करून दिली आहे. ते अशी आहे : शिकणारी मुले जेव्हा आपल्या शरीरासंबंधी आणि आजूबाजूचे वस्तूंचे जग, प्रतिकांचे जग, माणसांचे जग आणि त्यांच्या संस्कृतीचे, संकेतांचे जग यांच्याशी, आपल्या आकलन प्रक्रियांचा वापर करण्यात गुंततात तेव्हा, ज्ञान किंवा समज निर्माण होते. ड्युईने रचनावादी शिक्षणपद्धतीत, शिकणारे विद्यार्थी, आंतरक्रियेने, त्यावर विचार करून आणि कृती करून परीसराबाबतची आपली समज निर्माण करीत असतात, असे म्हटले आहे. (Dewey, ‘Experience and Education’ 1938).

लहान मुलांच्या शिक्षणात, परीसराबाबतची आपली समज निर्माण होत जाणे हे, शैक्षणिक कार्य प्रामुख्याने घडून यावे लागते. रचनावादी शिक्षणपद्धतीत याला, आपल्या अनुभवांचा अर्थ आपण लावत जाण्याचे, म्हणजे अर्थशोधनाचे तत्त्व असे म्हणतात. परिसरात (घर त्यात आलेच!) मुलांना सहजपणे कोणकोणते अनुभव प्राप्त होतात, किती अनुभव मिळतात आणि त्याला पूरक आणि त्यांतील त्रुटी भरून काढणारे अनुभव बालशाळा जाणीवपूर्वक देतात का? असा एक प्रश्न, बालशिक्षण व्यवहाराला पायाभूत असा आहे. बालवयात अनुभवांचे खाद्य काय मिळते यावर बालकांचा मेंदूविकास अवलंबून असतो. त्याचबरोबर, व्यवहारात ही सारी, बालकाची पुढील शिक्षणासाठी लागणारी तयारीही असते.

एक उदाहरण घेऊन या मुद्द्याचे स्पष्टीकरण अधिक होऊ शकेल.

आदिवासी मुले ही शालेय शिक्षणात बऱ्याचदा मागे पडतात, असा एक सार्वत्रिक अनुभव आपल्या गाठीला आहे. त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांची गुणवत्ता वाढविणाऱ्या अनेक योजना, प्रकल्प, कार्यक्रम व उपक्रम, आजवर, गेल्या अर्धशतकात राबविण्यात आले. त्यासाठी अनेक छोटे-मोठे अभ्यास झाले, प्रयोग झाले, वाड्मय निर्माण झाले, परंतु, यश अल्प प्रमाणात मिळाले. आदिवासी मुलांच्या शैक्षणिक मागासलेपणाची कारणे, त्यांच्या सामाजिक-आर्थिक मागासलेपणात शोधली गेली, त्यांवर स्वतंत्र उपाययोजनाही झाल्या. या दिशेने थोडी फार परिस्थिती सुधारली. मुलांचे शाळेत प्रवेशण्याचे प्रमाण नक्कीच वाढले. पण  शाळांतील गळतीचे आणि गुणवत्तेचे प्रश्न अजूनही रेंगाळतच राहिले.

आजच्या प्रगत सांस्कृतिक जीवनात, भाषा हेच प्रमुख असे जगण्याचे आधार-साधन असते. किंबहुना आजवरच्या सांस्कृतिक विकासाला कारणीभूत ठरलेला असा तो सर्वात मोठा व महत्त्वाचा घटक ठरला आहे. भाषा हेच प्रामुख्याने औपचारिक, अनौपचारिक आणि सहज शिक्षणाचे, माणसाचे, प्रभावी साधन आहे. भाषा वयोमानानुसार समृध्द असणे ही शिक्षणाची पूर्वअट आणि सबलता मानता येते; तर, भाषेची गरिबी हा शिक्षणातील फार मोठा अडथला ठरतो.

आदिवासी मुलांबाबतचा आमचा अनुभव असा आहे की, त्यांना घरांतून, गावांतून व जवळच्या परिसरातून भाषिक अनुभव (म्हणजे भाषा ऐकण्याचे, भाषा बोलण्याचे, भाषा वाचण्याचे आणि विविध प्रकारच्या लोकांशी भाषिक संवाद साधण्याचे अनुभव.) पुरेसे प्राप्त होत नसल्यामुळे, त्यांची भाषा ही औपचारिक शिक्षणातील प्रमाण, आशयध्यन, इतर विषयांच्या भाषिक पूर्वतयारीची भाषा, अशा अनेक अंगांनी अविकसित राहते, आणि त्याचा परिणाम मुलांच्या शालेय विषयांचे आकलन करून घेण्यावर होत असतो. शिक्षणात विषय समजणे, विषयांतील घटकांचे आकलन होणे याच बाबी प्राथमिक असतात. याच उंबरठ्यावर अडले तर, शालेय शिक्षण ‘पूर्ण’ होऊनही, शालेय शिक्षणाचे आकलनाचे उद्दिष्टच पूर्ण होत नाही. साधारणपणे असे मानले जाते की, सुशिक्षित, सुसंस्कृत, समृध्द घरांतील मुलांचा शालेय प्रवेशाच्या वेळेपर्यंत म्हणजे, सहाव्या वयापर्यंत आत्मसात झालेला शब्दसंग्रह सुमारे १५००० शब्दांपर्यंत वाढत गेलेला असतो! तेच, मागास मुलांच्या बाबतींत हा शब्दसंग्रह, जेमतेम, जास्तीत जास्त ३००० शब्दांपर्यंत असू शकतो; त्यांतही शब्दसंग्रहातील विविधताही फारशी नसते. परिणामतः ही मुले अभ्यासक्षेत्रात फार मागे राहूनच आपल्या शिक्षणाची सुरुवात करतात.

जे समाज-संस्कृतीचे धन परिस्थितीमुळे नाकारले जाते, त्याची उणीव भरून काढण्याची जबाबदारी, अर्थातच, बालशाळांवर येते. पण अशा परिस्थितीतल्या बहुतेक मुलांना शास्त्रीय, संपन्न बालवाडी मिळतच नाही; त्यांना गावातील अंगणवाडीत जावे लागते आणि अंगणवाडी ही प्रामुख्याने आरोग्ययोजना असल्यामुळे, मुलांची भाषिक-शैक्षणिक तहान भागविण्याची क्षमताच, दुर्दैवाने त्यांच्यामध्ये नसते. म्हणजे, या मुलांना, त्यांच्या वेगाने मेंदूविकास व क्षमताविकास होण्याच्या कालावधीत, पुरेशा बौद्धिक धनप्राप्तीपासून ही मुले वंचितच राहतात.

बालशिक्षणाचे क्षेत्र जेवढे महत्त्वाचे तेवढेच ते, आपल्या देशात, अजूनही दुर्लक्षितच आहे. त्यामुळे बालशिक्षणाचा शास्त्रीय दृष्टिकोण, शास्त्रीय बालशिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या गोष्टी आजही, फार दूरच्या वाटतात.

शास्त्रीय बालशिक्षणाची मांडणी, त्यांचे प्रयोग, प्रशिक्षण, प्रचार-प्रसार यांचे पहिले-वाहिले प्रयत्न, भारतात, करण्याचे श्रेय आहे ते गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांचे. त्यांचे एकत्रित प्रयत्न १९२३ साली सुरु झाले आणि १९२६ साली त्यांनी आपल्या प्रयत्नांना संस्थापक रूप दिले. याला आता लवकरच शंभर वर्षे पूर्ण होतील. आपला देश भौगोलिकदृष्टया व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असला तरी हा शंभर वर्षांचा कालावधीही मोठा आहे. गिजुभाई-ताराबाई यांचा वारसा, संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्टया पुढे नेण्याची चळवळ, समाजाने व वेळोवेळच्या सरकारांनी जाणीवपूर्वक पुढे नेली असती, तर आज शैक्षणिक क्षेत्रात, बालशिक्षणाचा शास्त्रीय पाया गुणाने व संख्येने विस्तारला असता आणि मुख्य म्हणजे यामुळे त्याच्या वरचे सारे शिक्षणच अधिक दर्जेदार होऊ शकले असते. तसे घडले नाही हे मात्र खरे.

परंतु अगदीच निराश व्हायचे कारण नाही. १९९०च्या दशकांत बालशिक्षणाचे महत्त्व हेरून व प्रश्न हाती घेऊन, एक प्रबोधनात्मक चळवळ, ‘महाराष्ट्र बालशिक्षण परिषद’ या नावाने महाराष्ट्रात आणि गेल्या दहा वर्षांत,  ‘गोमंतक बालशिक्षण परिषद’ गोव्यामध्ये उभी राहिली आहे. शिक्षणाकडे शास्त्रीय अंगाने पाहणारा समाज किती मोठ्या संख्येने या कार्याशी जोडला जातो त्यावर ह्या प्रयत्नांचे यश अवलंबून असणार आहे.

प्रत्येकानेच, या दिशेने, स्वतःचा अंदाज घ्यायला हरकत नाही!

 

You may also like...

2 Responses

  1. ulka khanolkar says:

    छानच सोप्या भाषेत लिहिलेले आहे. मी तुमचे शिक्षण परिवर्तनाची सामाजिक चळवळ हे पुस्तक वाचत आहे त्यामुळे ही समजणे सोपे गेले ..
    धन्यवाद ब्लॉग आय डी पाठवल्या बद्दल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)