रचनावादाचे तत्त्वज्ञान

शिक्षण हे नेहमीच कालानुरूप असावे, असे मी मानतो.  ‘कालानुरूप’ याचा अर्थ असा की, आजचे शिक्षण हे आजच्या काळाला साजेसे असे असावे.  ते भूतकाळाला साजेसे, असे असून चालणार नाही.  ‘काळ’ हा बदलत जातो, त्याचे रूप बदलत जाते, लोकांची जीवनशैली बदलत जाते, त्यानुसार लोकांच्या गरजा बदलत जातात, असे येथे गृहीत धरलेले आहे.  दुसरे गृहीत असे की आपण शिक्षणाविषयी बोलत असताना, आपला भर हा मुख्यत: औपचारिक व्यवस्थांच्या अंतर्गत होणा-या शिक्षणावर आहे.  शालापूर्व बालशिक्षण, शालेय शिक्षण, शालोत्तर महाविद्यालयीन शिक्षण अशा मर्यादांमध्ये आपण, येथे, शिक्षणाचा विचार करीत आहोत.  या मर्यादित क्षेत्रांच्या बाहेर खूप मोठे, दीर्घकालाला वेढलेले असे व्यापक अनौपचारिक आणि आपसूक होणा-या सहज शिक्षणाचे व्यापक क्षेत्र आहेच; आणि ते अधिक परिणामकारकही आहे.  पण, तूर्तास त्याचा विचार बाजूला ठेवू या.

आजचे शिक्षण हे आजच्या काळाला साजेसे असावे, असे म्हणण्यात एक मेख आहे.  शिक्षण हे नेहमीच भावी काळासाठी आणि दीर्घकालासाठी असते.  त्याची उद्दिष्टे ही भावीकाळातील जीवन व्यवहाराची उद्दिष्टे असतात.  आज शाळांमधून शिकत असलेल्या मुलांच्या भावी काळातील जीवनगरजांशी सुसंगत असे शिक्षण त्यांना मिळावे लागते.  त्यामुळे येथे ‘आजचे शिक्षण’ असे म्हणताना, ‘उद्याच्या गरजांसाठीचे शिक्षण’ असा त्याचा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो.  साहजिकच, उद्याच्या म्हणजे निदान नजीकच्या भविष्यकालाचा वेध घेऊन शिक्षणाच्या उद्दिष्टांचे आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या स्तरांवरील व्यवहारांचे नियोजन करीत राहण्याचे काम हे विचारवंतांचे आणि धोरणकर्त्यांचे एक कायमस्वरूपी काम आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

१. भारताच्या संदर्भात बदलता काळ

साधारणपणे १८५० ते १९८०-२००० हा भारतातील औद्योगिक प्रगतीचा काळ होता.  (१७६० ते १८३० (किंवा १७५०-१८५०) हा इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा काळ मानला जातो.  हा काळ संपल्यानंतर आणि ब्रिटीशांच्याच पावलांनी ही औद्योगिक क्रांतीची पावले भारतात दिसू लागली.)  भारताचे औद्योगीकरण दोन टप्प्यांत विभागता येईल.  पहिला टप्पा १८५० ते १९५० असा मुख्यत: भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळ, ज्यात ब्रिटीशांच्या विशिष्ट धोरणांनी भारतात औद्योगिकिकरणाचा पाया घातला गेला, परंतु प्रगती मात्र मंद गतीने झाली.  दुसरा टप्पा १९५० ते १९८० हा नियोजनपूर्वक औद्योगिक विस्ताराचा आणि म्हणून आधीच्या कालखंडापेक्षा अधिक वेगाने होणाऱ्या प्रगतीचा काळ होता.  अगदी थेट, एकविसाव्या शतकाच्या उदयापर्यंत या युगाची चलती होती.

शिक्षणाच्या दृष्टीकोणातून या युगाची काही वैशिष्ट्ये होती.

 • राष्ट्राच्या भावी औद्योगिक व तांत्रिक गरजांनुसार श्रमशक्ती नियोजन व त्यांनुसार उच्च व तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था निर्माण होऊ लागली.
 • औद्योगिक उत्पादनाचे प्रत्यक्ष काम हे बहुतांशी पुनरुक्तीकारक असल्यामुळे, म्हणजे तेच तेच काम त्याच पद्धतीने करणे, सामान्यत: शिक्षणाचा रोख ठराविक माहिती, समज आणि कौशल्ये वितरित करण्यावरच राहिला. काही पिढया शिक्षणाचे साचेबंद रूप तेच राहिले.  आशय, पद्धती अथवा दैनंदिन शिक्षण-व्यवहार गतिमंद राहिला.
 • अशा तऱ्हेच्या शिक्षणाला सुसंगत अशा प्रकारची मानसशास्त्रीय विचारसरणी – वर्तनवादी विचारसरणी – शिक्षणशास्त्रात आणि त्यावर आधारित अशा शिक्षणव्यवस्थेत व शिक्षणव्यवहारात स्थिर झाली. आजही, प्रामुख्याने या विचारसरणीचा पाया साऱ्या शिक्षणव्यवहारांवर असलेला दिसून येतो.
 • ठराविक गोष्टी ठराविक पद्धतीनेच येण्याला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे, त्याची परीक्षा, उत्तीर्णतेची पातळी, गुणांचे महत्त्व, तुलनात्मकता, उत्तीर्ण-अनुत्तीर्ण अशा बाबी शिक्षणव्यवहारांत महत्त्वाच्या होऊन बसल्या. यामुळेच वर्गांमधून हुशार – ढ अशी विद्यार्थ्यांची वर्गवारी होऊ लागली.  परीक्षांच्या विशिष्ट लेखी, वस्तुनिष्ठ व गुणांधारित स्वरूपामुळे तात्कालिक स्मृती, पाठांतर, घोकमपट्टी, गाईडे, क्लासेस अशा अनाठायी बाबींचे महत्त्व निर्माण झाले.
 • कोणत्याही व्यवसायाचे उच्च शिक्षण अथवा प्रत्यक्ष व्यवसाय यांमधील प्रवेशासाठी, शालांत परीक्षांमधील गुणांमधील गुणांची टक्केवारी हा एकमेव निकष होऊन बसला.
 • विद्यार्थ्यांना विशिष्ट परीक्षांसाठी काय आणि किती ‘द्यायचे’ याची निश्चितता असल्यामुळे शिक्षणव्यवहारात ‘देण्या’ला ‘घेण्या’पेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले. हे देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाला, येथे, मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले.  शिक्षकाकडे विद्यार्थ्यांना ‘शिकविण्या’चे काम सोपविण्यात आले, ‘विद्यार्थी शिकण्या’ची जबाबदारी त्याची नव्हती.  त्यामुळे, विद्यार्थ्याने शिकणे, परीक्षांतून गुण मिळविणे, उत्तीर्ण व अनुत्तीर्ण होणे या साऱ्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर ढकलण्यात आली.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे मोजमाप करण्याची पद्धती विकसित झाली.  पण शिक्षकाच्या शिकविण्याच्या मोजमापाच्या पट्ट्याच निर्माण झाल्या नाहीत.

अशाच आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपण विचारांत घेऊ शकू.  थोडक्यात असे की शिक्षणव्यवहारांचा एक बंदिस्त असा, ठराविक पद्धतीनेच चालणारा आणि विद्यार्थ्याच्या यशापयशाची जबाबदारी विद्यार्थ्याकडेच देणारा असा एक ढाचा तयार होऊन दीर्घकाल टिकला आहे.

नव्या काळाच्या नव्या गरजा

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाच्या गर्भात, पुढे येणारे एकविसावे शतकच केवळ होते असे नाही; तर या नव्या शतकाचे नवे रूप ठरविणाऱ्या काही घटनाही त्यात होत्या.  भारतीय अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरलेले जागतिकीकरणाचे धोरण, या दशकाच्या सुरुवातीलाच आपल्या पुढे ठेवले गेले.  गेल्या पंचवीस वर्षांतील विविध आर्थिक धोरणांना जागतिकीकरणाने दिशा दिली आहे.  १९९०-९९ हे दशक, तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी, ‘मेंदूदशक’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले, कारण, मेंदूविषयक संशोधनाला या दशकाने खूप मोठी उभारी दिली.  ही घटना अमेरिकेतील असली तरी तत्कालीन (आणि आजचेही) मेंदू संशोधन, त्यांचे निष्कर्ष व त्यांचे शैक्षणिक पर्यवसान या सर्वच बाबतींत सार्वत्रिक स्वरूपाचे मानले जात आहे, म्हणून या घटनेचा येथे उल्लेख केला आहे.  आज शिक्षणाच्या क्षेत्रात, महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरच ‘रचनावाद’ हा परवलीचा शब्द झाला आहे, त्याचा सैद्धांतिक व शरीरशास्त्रीय पुरावा या चालू असलेल्या मेंदूसंशोधनानेच, विशेषत: पुरविलेला आहे.  किंबहुना, अलीकडे शिक्षणक्षेत्राला ज्ञात झालेल्या, ‘मेंदूविरोधी शिक्षण’, ‘मेंदूपुरक शिक्षण’, ‘मेंदू आधारित शिक्षण’ या संकल्पना आज शिक्षणव्यवहाराला काही वेगळे वळण देण्यास सिद्ध झाल्या आहेत.

शिक्षणक्षेत्राला असे वेगळे वळण देण्यास जबाबदार ठरलेली आणखी काही संशोधनक्षेत्रे, त्यांमधील, ‘माणूस शिकतो कसा’ यावर प्रकाश टाकणारी संशोधने, निष्कर्ष आणि त्यांचा शिक्षणक्षेत्राशी बांधला गेलेला संबंध समजावून घेणे उपयुक्त ठरणारे आहे.  विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अशा प्रकारच्या शास्त्रीय संशोधनाच्या मिलापातून ‘आकलनशास्त्राचा १९६० च्या दशकात जन्म झाला.  याच्या जोडीलाच, मज्जाशास्त्रीय संशोधनाच्या वाढत्या पसा-यातून, मज्जा-मानसशास्त्र, मज्जा-भाषाशास्त्र, मज्जा-मानववंशशास्त्र इत्यादी अनेक जोडशास्त्रेही, याच कालांत उदय पावली आहेत.

शास्त्रीय ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा विकास, गेल्या अर्धशतकांत हातांत हात घालूनच झाला आहे.  हा काळ प्रामुख्याने जगभरच्या संगणकक्रांतीचा होता.  त्यामुळे, शास्त्रीय शोधांतून संगणकनिर्मिती, संगणक विकास, वापर आणि विस्तार यांतून विविध शास्त्रांतील संशोधनाला मिळालेली गती, त्याबरोबर पुन्हा, तंत्रज्ञानाचे नवनवे फुटणारे धुमारे अशी चक्राकार व गतिशील प्रक्रिया सातत्याने चालू झाली आहे.  एकविसावे शतक हे त्याचा सततचा साक्षीदार असणार आहे.

या साऱ्या गतिमान प्रक्रियांमुळे एकविसावे शतक विसाव्या शतकापेक्षा खूप वेगळे असणार आहे.  नेहमीच, ‘आज’च्या काळातील विद्यार्थ्यांच्या ‘उद्या’च्या गरजा बदलत जाणार आहेत.

इ.स. २००० पासून पुढे जागतिकीकरणाची पुढची पायरी सुरु झाली आहे.  थॉमस फ्रीडमन यांनी, आपल्या ‘द वर्ल्ड इज फ्लॅट’ या २००५ साली प्रकाशित केलेल्या ग्रंथात एकविसाव्या शतकापासून सुरु झालेल्या नव्या युगात (याला आपण ‘ज्ञान युग’ म्हणून ओळखू लागलो आहोत!)  होऊ घातलेल्या बदलांवर भाष्य केले आहे.  त्यांचे विवेचन असे आहे की, औद्योगिक युगात (१८०० ते २००० या काळात) जग लहान झाले.  या काळात वेगाने बदल घडवून आणणारा घटक होता तो म्हणजे औद्योगिक बहुराष्ट्रीय कंपन्या.  आपल्या बाजारपेठांच्या गरजा आणि श्रमशक्तीच्या गरजा भागविण्यासाठी त्यांनी आपले व्यवसाय जागतिक पातळीवर संघटीत केले आणि त्याकरवी या कंपन्याही बलाढ्य झाल्या.  मात्र, एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ज्ञानाचे, व्यापाराचे, अर्थकारणाचे रूप विलक्षण पालटले आहे.  फ्रीडमन यांच्या मते, या नवयुगाचे वैशिष्ट्य असे आहे की, आज, प्रत्येक व्यक्ती, इतरांशी सहकार करून जागतिक स्पर्धेत उतरू शकेल, अशी नवी शक्ती तिने प्राप्त केलेली असेल.  नवे चित्र असे आहे की आता ही समर्थ, स्वाधिकारप्राप्त आणि अन्य व्यक्तींशी जोडून घेऊ शकणारी व्यक्ती किंवा अशा व्यक्तींचे छोटे छोटे गटसुद्धा सहजपणे ‘जागतिक’ होऊ शकतात.  थॉमस फ्रीडमन यांनी या घटनेला ‘सपाट-विश्वमंच’ म्हटले आहे.  हा विश्वाचा सपाटमंच तीन महत्वाच्या शोधवस्तूंच्या समन्वयाने झाला आहे.  एक, स्वत:जवळची माहिती, आशय हा स्वत:च डिजिटल स्वरुपात लिहिण्यासाठी उपयुक्त असा व्यक्तिगत संगणक, दोन, अशी जगात कुठेही निर्माण झालेली डिजिटल माहिती सर्वांनाच सहजपणे उपलब्ध करून देणारी ‘फायबर-ऑप्टिक केबल’ आणि तिसरे म्हणजे, जगाच्या कुठल्याही काना-कोपऱ्यातून अशा डिजिटल माहितीत स्वत:ची भर घालून तिच्याशी जोडून देणारी ‘वर्क फ्लो सॉफ्टवेअर’.  फ्रीडमन यांनी असे दाखवून दिले आहे की, २००० सालच्या आसपास एकदम उगवलेल्या या घटकांची आधी कोणी कल्पनादेखील केली नव्हती.  पूर्वी कधीही नव्हती इतकी, जगाला पालाण घालण्याची, शक्ती प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होऊ शकते.  आता जग जवळ आले आहे, आपण इतरांशी स्पर्धा करू शकतो किंवा त्यांना जवळ करून त्यांच्या समवेत काम करू शकतो.  इतरांबरोबर काम करण्याच्या हजारो नव्या संधी आता उपलब्ध झाल्या आहेत.  या जागतिक स्पर्धेच्या आणि जागतिक संधींच्या संदर्भात आपण नेमके कुठे बसतो, याचा विचार प्रत्येकजण करू शकतो, असे फ्रीडमन यांचे विवेचन आहे.

व्यक्तींचे वाढत चाललेले संपर्कसामर्थ्य, नोकरीच्या व व्यवसायांच्या नव्या संधी आणि त्यासाठी स्वत:ची करावयाची तयारी, आणि नव्या जगाची नवी स्वप्ने घेऊन उद्याचा युवक जागतिक स्तरावरील वातावरणात स्वत:चे स्थान निश्चित करू पाहणार आहे; अशावेळी त्याच्या गरजा पूर्णत: बदललेल्या असणार आहेत.

आत्तापर्यंतच्या विवेचनाचा सारांश असा आहे :

 • शिक्षण हे नेहमीच भाविकालाभिमुख असते, असावे लागते.
 • शिक्षण हे बदलत्या काळानुरूप बदलत जावे लागते.
 • भारताच्या संदर्भात असे आढळते की, गेल्या अडीचशे वर्षांत काळ खूपच बदलला आहे. इ.स. १८५० ते १९५० हा मंदगती औद्योगिकीकरणाचा वेगवान काळ होता.
 • या काळाच्या गरजांनुसार एक विशिष्ट अशी शिक्षणप्रणाली सर्वदूर रूढ झाली. ही बंदिस्त स्वरुपाची आणि तत्कालीन मानसशास्त्राचा आधार असलेली अशी ‘वर्तनवादी’ शिक्षणप्रणाली होती.
 • आजही भारतातील शिक्षण विचारांवर व शिक्षणआचारांवर वर्तनवादी विचारसरणीचाच प्रभाव दिसून येतो.
 • विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळातील वेगवान अशा शास्त्रीय व तांत्रिक बदलांमुळे, एकविसाव्या शतकात, विद्यार्थ्यांच्या गरजा सातत्याने बदलत जाणार आहेत.

२. नव्या गरजांसाठी नवे शिक्षण

आजच्या विद्यार्थ्यांच्या उद्याच्या गरजांशी मिळते-जुळते घेण्याची ताकद त्यांच्या आजच्या शिक्षणात असली पाहिजे, ही भूमिका स्पष्टपणे घेऊनच आपण शिक्षणाचा सारा विचार करण्यास उद्युक्त झाले पाहिजे.

नव्या युगाच्या नव्या गरजांसाठीचे नवे शिक्षण आधीच्या, म्हणजे मागील काळातील गरजांसाठीच्या शिक्षणापेक्षा वेगळे असणार हे गृहीत धरले पाहिजे.  शिक्षण बदलामध्ये चार तऱ्हेचे बदल अपेक्षित असतात.  एक, शिक्षणाच्या उद्दिष्टांत, दोन, आशयात; तीन, शिकण्या-शिकविण्याच्या पद्धतींत आणि चार, शिकण्याच्या मूल्यमापन पद्धतींत.  एकदा नव्या काळाच्या नव्या गरजांसाठी उद्दिष्टे ठरली की मग त्यानुसार आपोआपच शिक्षणाच्या आशयांत बदल होतो.  बदलत्या आशयाचा शिकणाऱ्याच्या अंगाने आपण विचार करीत गेलो की, आपण शिकण्याच्या आणि म्हणून शिकविण्याच्या सुसंगत अशा वेगळ्या पद्धतींकडे अपरिहार्यपणे वळतो.  आणि अखेरीस, आशय आणि पद्धतींनुसार तसेच मूळ उद्दिष्टांच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीचे मोजमाप रास्तपणे होण्यासाठी, नव्या, सुसंगत नी नेमक्या अशा मूल्यमापन पद्धतींचा वेध घ्यावा लागतो.  या सर्व गोष्टी एकत्रितरित्या लक्षात घेतल्या तर शिक्षणाची सारी चौकटच आमुलाग्र बदलून जाते, हे दिसून येईल.  यालाच आपण, शिक्षणातील ‘परिवर्तन’ असे व्यापक अर्थाने म्हणू शकू.  व्यापक अर्थाने, असे येथे म्हटले, कारण, वरील गोष्टी बदलल्या की त्यांच्या अनुषंगाने इतरही कितीतरी गोष्टी बदलतात.  उदाहरणार्थ, वरील बदलांबरोबर शिक्षणाच्या वर्गातील बैठकीपासून ते वर्गभिंती –शाळाभिंतींच्या वापरापासून ते थेट वर्ग-शाळा व्यवस्थापनाच्या पद्धतींपर्यंत बदल होणे अपरिहार्य असते.  शिक्षणाची रचनाच बदलते,  त्या अनुषंगाने, नियमावली, कायदे आणि थेट शासकीय धोरणविषयक बदलही घडून यावे लागतात.  या सगळ्याच घटकांचे व त्याचबरोबर कौटुंबिक, सामाजिक व सांस्कृतिक, आर्थिक नि राजकीय घटकांचे व घटनांचे बरे-वाईट, कमी-जास्त परिणाम अंतिमत: शिकणाऱ्या मुलांच्या शिकण्यावर होत असतात.  एकीकडे अशा परिणामांचे अभ्यास होत राहणे व दुसरीकडे, त्यांनुसार शिकण्या-शिकविण्यात बदल होत जाणे अगत्याचे असते.

अशाप्रकारे लहान-मोठ्या बदलांकरवी, मुलांची शिकण्याची प्रक्रिया बदलत जात असते.  तिच्यातील घटक, तिचे स्वरूप आणि तिच्यातून होणारे आशय आकलन यांत सातत्याने बदल होत जातात.  त्यामुळे, साहजिकच शिक्षणाचे स्वरूप ठराविक, साचेबंद असे न राहता ते प्रवाही बनते.  ‘प्रवाही शिक्षणस्वरूप’ हे पुढील काळाचे एक आव्हानात्मक वैशिष्ट्य असणार आहे.

सारांश  

 • शिक्षणात बदल करायचा झाल्यास, चार तऱ्हेचे बदल अपेक्षित असतात; शिक्षणाच्या उद्दिष्टांत, आशयात, शिकण्या-शिकविण्याच्या पद्धतीत आणि शिकण्याच्या मूल्यमापनपद्धतीत.

३. रचनात्मक शिक्षण : विचार व व्यवहार

आज बदलत्या गरजांना साजेशी अशी नवी शिक्षणप्रणाली जगाच्या पटलावर रुजू झाली आहे.  हिला ‘ज्ञानरचनावादी’, ‘रचनावादी’ किंवा ‘रचनात्मक’ या विविध नावांनी संबोधले जाते.

यापूर्वीच्या ‘वर्तनवादी’ विचारसरणीपेक्षा ही वेगळी आहे.  ज्ञानप्राप्तीची एक शिक्षणप्रणाली म्हणून वर्तनवाद व रचनावाद यांमध्ये दृष्टिकोणाचा मूलभूत फरक आहे.  ज्ञानउत्पत्तीशास्त्रात आजवर, सातत्याने, चर्चेत असलेला मुख्य प्रश्न आहे तो, आपल्याला ज्ञान कसे होते?  हे ज्ञान, ही  ते प्राप्त करणाऱ्यापासून अलग अशी निखळ गोष्ट आहे असे मानणे, हा एक दृष्टिकोण झाला.  (ही तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील ‘वास्तववादा’ची विद्याशाखा होय!)  दुसरा दृष्टिकोण असा की, ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया ही ज्ञान घेणाऱ्याशी संबंधित असून, आपल्या अनुभवांच्या व आजूबाजूच्या वातावरणाच्या आधारे प्रत्येकजण आपापले ज्ञान ‘निर्माण’ करीत असतो.  शिक्षणातील वर्तनवादी विचारसरणीने वस्तुनिष्ठ (Objectivist view) किंवा वास्तववादी दृष्टिकोण आपलासा करून शिक्षणरचनेची मांडणी करण्यावर भर दिला.  रचनात्मक विचारसरणी मात्र, याच्या विरोधी भूमिका घेते.  बाह्य वास्तवाचे, व्यक्तीनिष्ठ स्वरूपात, व्यक्तीच्या अर्थात्मकतेतून ज्ञानप्रतिमा निर्माण होते; अशी ही भूमिका आहे.

रचनात्मक शिक्षणप्रणाली असे मानते की, अनुभवांचा अर्थ लावणे हीच शिकण्याची प्रक्रिया होय.  यात ‘शिकणे’ ही मानसिक पातळीवरची प्रक्रिया मानलेली आहे.  येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, रचनावाद हा वास्तव जगाचे अस्तित्व नाकारत नाही.  फक्त ह्या जगाची ओळख करून घेणे ही व्यक्तीनिष्ठ बाब असून, आपल्या अनुभवांचा आपण आपल्या परीने, आपल्या प्रतिपादनानुसार अर्थ लावून घेत असतो; समजावून घेत असतो.  त्यामुळे हा अर्थ, ही समज, हे ज्ञान, ही ओळख ही आपली स्वत:चीच निष्पत्ती असते.  अशी ज्ञानरचनावादाची भूमिका आहे.  थोडक्यात, माणसे अर्थ निर्माण करीत असतात, संपादन करीत नसतात.  व्यक्ती नव्या अनुभवाचा आपल्या पूर्वज्ञानाशी संबंध बांधून ज्ञानप्राप्ती करीत असतात.  साहजिकच, नवे ज्ञान आल्यानंतर ते आपल्या पूर्वज्ञानाची मानसप्रतिमा बदलून टाकते.  नव्या-जुन्याच्या मिलापाने एक नवी प्रतिमा सिद्ध होते; ही आधीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी असू शकते.  आता हे ‘नवे’ पूर्वज्ञान झाले.  या चक्राकार पद्धतीने, ज्ञानाच्या रचनेत सतत बदल संभवतात.  नित्यनूतनता हे ज्ञानाचे वैशिष्ट्य असते ते यामुळेच.  शिवाय, अनुभवाचा अर्थ लावताना एकच ‘बरोबर’, असा अर्थ असत नाही.  एकाच अनुभवाचा अनेक अंगांनी अनेक प्रकारचा अर्थ असू शकतो.  ज्या संदर्भात अनुभवकर्त्याला अर्थनिश्चिती करावयाची असते त्या संदर्भाने अर्थाचे परिमाण ठरते.  यामुळेही ज्ञान हे नित्यनूतन असते.  एकदा मिळालेले ज्ञान जेव्हा वेगवेगळ्या परिस्थितीत, संदर्भात, घटनांत वापरले जाते तेव्हा, ज्या संदर्भात वापरले जाते त्याच्या स्वरूपावरून ‘मूळ’ अर्थामध्ये बदल होण्याचीही शक्यता असते, कारण, अनुभवकर्त्याला अर्थाची आणखी वेगळी परिमाणे अनुभवास येत जातात.

अनुभवकर्ता आपले ज्ञान आपल्या मानस (मेंदूमधील) स्मृतिकोशात साठवून ठेवत असतो.  नव्या ज्ञानाच्या निर्मितीमुळे, ज्याप्रमाणे, पूर्वज्ञानाची प्रतिमा बदलत जाते, त्याचप्रमाणे, स्मृतीही बदलते स्वरूप धारण करते.

कोणतेही शिकणे हे विशिष्ट अशा संदर्भातच (context) घडून येत असते; कारण, या संदर्भित प्रदेशातच ज्ञान फुलत जाते, निर्माण होत जाते; असाही एक दावा रचनात्मक शिक्षणप्रणाली करीत असते.

पियाजेच्या संशोधनांतून रचनावादी विचारसरणीचा उदय झाला तेव्हा आणि वायगोट्स्कीचा सामाजिक दृष्टिकोण, रचनावादाचा एक पाया बनल्यापासून, रचनावाद हा प्रामुख्याने ‘व्यक्तिगत रचनावाद’च (personal constructivism) होता.  या रचनावादात व्यक्ती (शिकणारी व्यक्ती) विचारांच्या केंद्रस्थानी होती.  ही व्यक्ती आपणहून, स्वत:चे स्वत: आणि स्वयंकृतीतून शिकणारी होती.  परंतु, या व्यक्तीच्या शिकण्याचे जे संदर्भित क्षेत्र होते, ते मात्र सामाजिक-सांस्कृतिक असे होते.  ‘प्रत्येक नव्या अनुभवांतून व्यक्ती शिकत असते’, आणि ‘पूर्वज्ञानाशी जोडूनच नव्या अनुभवांचा अर्थ लावला जातो.’  ही रचनावादी प्रणालीची जी दोन मुख्य तत्वे आहेत, ती, जशी व्यक्ती-विशिष्ट आहेत तशीच ती समाज-संस्कृती-विशिष्टही आहेत.  त्यामुळे व्यक्तीचे शिकणे ही निव्वळ व्यक्तिगत गोष्ट राहत नाही.  शिवाय, तात्त्विक रचनावाद असेही मानत आला आहे की, व्यक्तीने प्राप्त केलेले ज्ञान ही अनेक संदर्भांशी, अनेकविध अर्थ-निर्मितीशी जोडलेली अशी गुंतागुंतीची किंवा व्यामिश्र अशी गोष्ट आहे.  त्यामुळे, १९७० व १९८० या दोन दशकांमध्ये, शिकण्याची संकल्पना ही नेहमीच संदर्भाधीन संकल्पना असते, अशी भूमिका पुढे आली.  त्यातून ‘संदर्भाधीन रचनावाद’ (contextual constructivism) पुढे सरसावला.

डेविड आसुबेल यांनी, ‘द सायकोलॉजी ऑव्ह मिनिंगफुल वर्बल लर्निंग’ या आपल्या १९६३ च्या ग्रंथातून, ‘अर्थपूर्ण शिक्षणा’चा सिद्धांत मांडला.  त्याच्या मते, विद्यार्थी, जेव्हा नवे काही शिकू पाहतात तेव्हा ते त्याआधी अस्तित्वात असलेल्या, संकल्पनात्मक संरचनेशी जुळवून बघतात (घेतात), आणि या प्रक्रियेतून अर्थपूर्ण शिकणे निर्माण होते.  वॉन ग्लेसरफिल्ड यांनी, आपल्या एका लेखात (कॉग्निशन, कन्स्ट्रक्शन ऑव्ह नॉलेज अँड टिचिंग (१९८९) रचनावादाचे  ‘थिअरी ऑव्ह नोइंग’ असे वर्णन केले आहे.  कारण, त्याच्या मते, रचनावाद हा ‘ज्ञाना’चा विचार, (‘थिअरी ऑव्ह नॉलेज’) नसून तो ‘शिकण्या’चा (थिअरी ऑव्ह लर्निंग) सिद्धांत आहे.  म्हणजे, असे की रचनावादाचा संबंध ‘ज्ञान’ ह्या अमूर्त गोष्टीशी नसून ती शिकणाऱ्याशी संबंधित अशी बाब आहे; ती शिकणाऱ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेशी संबंधित अशी बाब आहे; आणि हे शिकणे विशिष्ट संदर्भातच घडून येते.  हे संदर्भित क्षेत्र हे भोवतालच्या संस्कृतीचे क्षेत्र असते.  संस्कृतीचा इतिहास, संस्कृतीचे स्वरूप, भाषा, परंपरा, प्रथा, प्रतीके या साऱ्यांतून घडलेले असे शिकणाऱ्याचे वास्तव असते.

अशारितीने रचनावादी विचारप्रणालीचा प्रवास ‘व्यक्तिगत रचनावाद’ इथपासून तो ‘संदर्भाधीन रचनावाद’ इथपर्यंत झाला आहे.  “व्यक्तिगत रचनावाद हे रचनावादाचे शरीररचनाशास्त्र (anatomy) व शरीरक्रिया विज्ञान ((((physiology)))) असून, संदर्भाधीन रचनावाद हे रचनावादाचे परिस्थितीविज्ञान (ecology) आहे.”  असा अभिप्राय, आपल्या एका लेखात (Contextual constructivism: the impact of culture on the learning and teaching of science -1993) कोबर्न यांनी दिला आहे.  विद्यार्थी जग कसे आकळून घेतो हे समजावून घ्यायचे झाले तर या दोन्ही प्रकारच्या रचनावादांची गरज आहे; असे कोबर्न यांचे प्रतिपादन आहे.

सारांश

 • आज बदलत्या गरजांना साजेशी अशी नवी शिक्षणप्रणाली जगाच्या पटलावर रुजू झाली आहे. हिला ‘ज्ञानरचनावादी’, ‘रचनावादी’, ‘रचनात्मक’ या विविध नावांनी संबोधले जाते.
 • आधीच्या वर्तनवादी विचारसरणीपेक्षा ही विचारसरणी मूलत: वेगळी आहे.
 • अनुभवांचा अर्थ लावणे हीच शिकण्याची प्रक्रिया असते असे, रचनावादी शिक्षणप्रणाली मानते.
 • अर्थ निर्माण करणे ही व्यक्तीनिष्ठ बाब असते.
 • वेगळ्या परिस्थितीत, वेगळ्या संदर्भात, अर्थांची परिमाणे वेगवेगळी असू शकतात.
 • कोणतेही शिकणे हे नेहमी विशिष्ट संदर्भातच घडून येत असते.
 • प्रत्येक नव्या अनुभवांतून व्यक्ती शिकत असते; आणि पूर्वज्ञानाशी जोडूनच नव्या अनुभवांचा अर्थ लावला जातो. ही रचनावादी प्रणालीची दोन मुख्य तत्वे आहेत.
 • व्यक्ती जग कसे आकळून घेते हे समजण्यासाठी ‘व्यक्तिगत रचनावाद’ आणि ‘संदर्भाधीन रचनावाद’ असे रचनावादी विचारसरणीचे दोन प्रकार विचारात घ्यावे लागतात.

मुलांच्या शिकण्याबाबत, वर्तनवादी आणि आकलनवादी विचारसरणींपेक्षा, रचनावादी विचारसरणी सरस आहे, उजवी आहे, अशी भूमिका घेताना, आधीच्या विचारसरणींनी निर्माण केलेल्या शिक्षणपद्धती किंवा शिक्षणतंत्रांना पूर्णतः सोडचिट्ठी द्यावी का?  अशा त-हेचा एक प्रश्न, शिक्षणव्यवहाराच्या संदर्भात बऱ्याचदा उपस्थित केला जातो.  रचनावादी पद्धतीत, आधीच्या विचारसरणीतील ‘शिकविण्या’च्या कामापासून ‘शिकण्या’च्या कामाकडे उडी मारत असतो.  वर्तनवादात शिक्षक माहितीचे वितरण करीत असतो, त्याचा एक नित्याचा शिरस्ता (Routine) ठरून गेलेला असतो.  मात्र रचनावादात अपेक्षा असते ती, विद्यार्थ्याने आपल्या कल्पना आपण रचत जाण्याची आणि त्या व्यवहारात ताडून पाहण्याची.  आकलनवादी आणि रचनावादी विचारसरणीत, विद्यार्थ्यात शिकण्याच्या प्रक्रियेत मग्न होण्याची अपेक्षा असते; याद्वारे माहितीवर प्रक्रिया करण्याचे, एवढेच नव्हे तर या माहितीचे, स्वत:चे अर्थ लावून त्या माहितीला, दिलेल्या संदर्भात पण स्वत:चे अर्थ लावून त्या माहितीला, दिलेल्या संदर्भात पण स्वत:च्या गरजांशी सुसंगत राखून, माहितीचे स्वरूप स्वत:पुरते बदलण्याचे कामही, विद्यार्थी करीत जातो.  येथे मूळ फरक आहे तो कुणीतरी (शिक्षिकेने) शिकवून शिकणे आणि आपणहून प्रयत्नपूर्वक शिकणे या दोन प्रक्रियांमध्ये.  या दोन्हींमधील रास्त पद्धत कोणती?  याविषयी अजूनही अनेकांच्या मनांत संभ्रम आहे.

या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न तज्ज्ञ विचारकांनी केला आहे.

मुलांच्या शिकण्याच्या बाबतींत, वर्गात करीत असलेले (पंचेन्द्रियांचा वापर करून व हाताळून) काम व त्यातून घडणारी मानस पातळीवरची प्रक्रिया या दोन्हींचा घनिष्ठ संबंध असतो.  हातातले काम (शारीरिक, बौद्धिक, भाषिक गुंतवणूक होऊन) जेवढे अधिक गुंतागुंतीचे तेवढी मानस-प्रक्रियाही अधिक गुंतागुंतीची साहजिकच असते.  जोनासन यांनी, आपल्या एका लेखात, (इवॅल्युएटिंग कंस्ट्क्टीविस्टीक लर्निंग) ज्ञानग्रहणाच्या तीन पाय-या सांगितल्या आहेत.  परिचयात्मक (इंट्रोडक्टरी), प्रगत (अॅडव्हान्सड्) व निपुण (expert) जोनासन यांचे प्रतिपादन असे आहे की, परिचयात्मक स्तरावर, वर्तनवादी व आकलनवादी विचारसरणीतील शिक्षणाचे वस्तुनिष्ठ स्वरूप उपयोगी ठरते; कारण, येथे विषय, त्यांतील घटक यांची केवळ ओळख करून घेतली जाते.  परंतु विद्यार्थ्यांना पुढे जाताना, त्यांचे पुर्वज्ञानातील पूर्वग्रह, श्रद्धा, गैरसमज इ. ओळखून दूर करण्याचे काम, करून शिकण्याच्या रचनावादी पद्धतीने चांगले होऊन, म्हणजे आपल्या मानस पातळीवरील प्रतिमा सुधारून, प्रगत दिशेने जाता येते.  संकल्पना समजणे, गुंतागुंतीचे प्रश्न सोडविता येणे, खोलवरचा आशय आकलन होणे यासाठी मात्र व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या रचनावादी पद्धतींचा खास उपयोग होऊ शकतो.

रचनावादात, विद्यार्थ्याने आपल्या शिक्षणाची जबाबदारी आपली आपणच घ्यायची असते; व्यक्तिनिष्ठता हा या विचाराचा पाया आहे.  अनुभवांची अर्थनिश्चिती व्यक्तीभिन्न असणार.  मग अशावेळी, शिक्षणाच्या फलश्रुतीचे समानतेने मोजमाप कसे करणार?  असा एक प्रश्न, रचनावादाचा अवलंब करू पाहणाऱ्या शिक्षकांच्या मनांत आहे, असे आढळते.

याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, रचनावादी वर्गातले शिक्षण हे हेतूपूर्णच असते.  कोणता घटक आता शिकायचा आहे, हे शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनाही ठाऊक असते.  त्यामुळे शिकण्याची अंतिम फलश्रुती (ज्ञान, कौशल्य, माहिती) काय आहे हेही माहीत असते.  त्यामुळे घटक स्तरावर, सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीने, व्यक्तिगत फलश्रुतीचे मूल्यमापन करणे अशक्य नसते.

रचनावादी पद्धतीतील मूल्यमापन हे घटक मूल्यमापन असते; ते विषय मूल्यमापन नसते.  त्यामुळे अभिजात संगीताच्या कार्यक्रमात गाणे आणि हार्मोनियम वरील सुरावट बरोबरीने जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचे वर्गामधील शिकणे आणि त्या शिकलेल्या घटकाचे मूल्यमापन एकत्रच जावे लागते.  त्यामुळे रचनावादी पद्धतीत मूल्यमापन हे, सहामाही, वार्षिक असे नसते, तर ते दैनंदिनच असते.  आपल्या सरावाच्या वर्तनवादी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षांतून, पस्तीस टक्क्याचे उत्तीर्णतेचे मान ठरवता येते, परंतु या उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या राहिलेल्या पासष्ट टक्क्यांचे न येण्याचे, काहीच केले जात नाही.  पासष्ट टक्के न शिकण्याचा (अज्ञानाचा?) डोंगर प्रतिवर्षी वाढतच जातो.  रचनावादी मूल्यमापन पद्धती या अडचणीला छेद देते.  येथे प्रत्येक घटकाचे वैयक्तिक पातळीवर मूल्यमापन होऊन, त्यातील राहिलेले, न आलेले, पुन्हा करण्याची व तो घटक परिपूर्ण शिकण्याची व्यवस्था असते.  कारण, पुन्हा, इथले मूल्यमापन विद्यार्थ्याने काय कमावले हे सांगण्यासाठी नसते, तर त्याचे काय राहिले, तो नेमका कुठे अडतोय, त्याला काय समजले नाही, ते का समजत नाहीये, या बाबी उघड करण्यावर मुल्यमापनाचा रोख असतो.  मूल्यमापन हे शिकणा-यासाठी व त्याची जबाबदारी घेतलेल्या शिक्षकासाठी असते.  या दोघांनाही पुढील योग्य अशा कृतीला उद्युक्त करण्यासाठी ते असते.  परिपूर्णतेने शिकण्याच्या दिशेने, शिकणाराला नेणारे असे हे मूल्यमापन असते.

रचनावादी विचारसरणी आणि तिचा शाळांमधून उपयोग यासंदर्भात इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.  (असे काही प्रश्न, चर्चेसाठी म्हणून, मी या निबंधाच्या अखेरीस सूचित करीन!)  मला इथे आपले लक्ष वेधायचे आहे ते, रचनावादी विचारसरणीचा स्वीकार केल्यास, आजच्या नि भविष्यातील शिक्षणाच्या संदर्भात, उपस्थित होऊ शकणाऱ्या काही मुलभूत मुद्यांकडे.

शिक्षकाची भूमिका व मानसिकता

पहिला मुद्दा आहे तो म्हणजे रचनावादी शिक्षणात शिक्षकाची बदलती भूमिका आणि बदलायला हवी अशी मानसिकता.

शिक्षकांच्या मागील कित्येक पिढ्या वर्तनवादी शिक्षणातून घडलेल्या असल्यामुळे, आणि ‘आपण जसे शिकलो तसेच शिकवायचे असते’, या भूमिकेवर बहुतांशी शिक्षकांची नितांत श्रद्धा असल्यामुळे, रचनावादात अपेक्षित असलेली भूमिका स्वीकारण्याकडे खूपशा शिक्षकांचा कल नाही.  आपण शिकविल्याशिवाय मुले शिकणार नाहीत, यावर अशा शिक्षकांचा अजूनही गाढ विश्वास आहे.  वर्गशिक्षणातील आपले मध्यवर्ती स्थान सोडून ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सुपूर्त करण्याची, अशा शिक्षकांची तयारी नाही.  चालू व्यवस्था टिकवून ठेवण्यात एक सोय असते; नवे फारसे काही करावे लागत नाही, याचीही सवय होते आणि मग नवे काही करून पाहण्याची उमेद नसते.  शिवाय नवे, आजवर कधी न केलेले करून पाहण्यात एक अनिश्चितता असते, ती विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची फारशी नसते, तर ती असते स्वत:च्या क्षमतांचा कस लागण्याची.  त्यामुळे अनिश्चिततेशी सामना करण्यापेक्षा सुरुवातीसच माघार घेणे चांगले अशीही वृत्ती बळावते.

नव्या रचनावादी शिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शिक्षकाला आपली मानसिकता बदलणे क्रमप्राप्त आहे.  ती रचनावादी शिक्षणाच्या प्रवाहात शिरण्यासाठी बदलणे जसे आवश्यक आहे, तद्वतच, ती या नवप्रवाहात टिकून कार्यक्षम राहण्यासाठीसुद्धा आवश्यक आहे.  धर्मगंडात बुडालेल्या आणि त्याच्या कर्मकांडात अडकलेल्यास धर्मातीततेची दीक्षा घेणे जेवढे अवघड असते, तेवढेच, नव्या शिक्षणाचे मर्म समजावून घेवून त्यादिशेने आपले मन बदलणे शिक्षकांना अवघड जात असते.  अपेक्षित अशा बदलत्या भूमिकेबरोबर आपली मानसिकता बदलण्याचे आव्हान निदान काही शिक्षक तरी घेऊ लागले आहेत, हे नव्याने होऊ घातलेल्या शिक्षणक्रांतीचे प्रसादचिन्ह आहे.

विचार करणारा शिक्षक, गरजेनुसार स्वत:ला वेळोवेळी बदलत जाणारा लवचिक शिक्षक, मुलांच्या भावनांची सदैव कदर करणारा संवेदनशील शिक्षक, मुलांना शिकवीत राहण्यापेक्षा शिकायलाच शिकविणारा शिक्षक, विद्यार्थ्याच्या बरोबरीने स्वत:लाही संपन्न करीत जाणारा आणि विद्यार्थ्याच्या आनंदी शिक्षणप्रक्रियेत सहभागी होऊन आपणही आनंदी होणारा असा एक आदर्श रचनावादी शिक्षक माझ्या मन:चक्षूंसमोर उभा राहतो.

शिक्षकाची सबलता आणि सत्ता काय असते.  याविषयीचे हेम गिनोट (Haim G. Ginott) यांचे एक उद्धृत अलीकडेच माझ्या वाचनात आले.  (मेकींग क्लासरूम बेटर – ट्रेसी तोकुहामा) त्यांनी ‘एका शिक्षकाचे मनोगत’ मांडले आहे, ते असे :

“भीती वाटावी अशा एका निष्कर्षाला मी आलो आहे.  वर्गामधील निर्णायक अधिकारांचा मी धनी आहे.  माझा वैयक्तिक दृष्टिकोण जसा असेल तसे इथले वातावरण घडत असते.  जसा माझ्या मनाचा काळ असेल तसे इथले हवामान ठरत असते.  एक शिक्षक म्हणून माझ्या हाती विलक्षण सत्ता असते; तिचा वापर करून, विद्यार्थ्याचे जीवन मी दु:खी करू शकतो किंवा आनंदी.  मी त्याचे हाल करण्याचे हत्यार बनू शकतो अथवा त्याला प्रेरणा देणारे साधन बनू शकतो.  मी त्याचा पाणउतारा करू शकतो किंवा त्याला हसवूही शकतो.  मी मन दुखवू शकतो किंवा मनाची जखम भरूनही काढू शकतो.  घडणाऱ्या सर्वच घटनांमध्ये माझा प्रतिसाद निर्णायक असतो.  तोच ठरवतो की निर्माण होणारा पेचप्रसंग वाढेल की नाहीसा होईल, आणि विद्यार्थी एक असंस्कृत माणूस म्हणून घडेल की सुसंस्कृत!

वर्गातील हे अशाप्रकारचे अधिकार पूर्वीही वर्तनवादी विचारसरणीच्या काळात होते, आणि आजही ते रचनावादी विचारसरणीच्या काळात आहेत.  दोन्ही विचारसरणींतील हे एक साम्य लक्षात घेण्यासारखे आहे.

 आकलनविषयक संघर्ष

रचनावादी विचारसरणी ही प्रामुख्याने शिक्षक व त्यांचे शिकविणे याबाबतची नसून ती विद्यार्थी व त्यांचे शिकणे यांबाबत आहे.  त्यामुळे या पद्धतीत प्रत्यक्ष विद्यार्थ्याचे शिकणे हीच गोष्ट वर्गातील व्यवहारात केंद्रस्थानी असणार आहे.  हे शिकणे अर्थपूर्ण असावे लागते.  येथे ज्ञाननिर्मिती ही हेतुपूर्ण ज्ञाननिर्मिती असावी लागते.  ही शिकण्याची प्रक्रिया शिकण्याच्या विशिष्ट अशा वातावरणात घडून येत असली तरी तिचे मुख्य कार्य हे शिकणाऱ्याच्या मनात, म्हणजे मेंदूत घडत असते.  हे कसे घडून येते याची मांडणी पियाजे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करून ठेवली आहे.  ही मांडणी करताना, पियाजे वगैरेंनी ‘सामाजिक-आकलनविषयक संघर्ष’ अशी एक पायाभूत संकल्पना मांडली आहे.  मुले शिकताना जेव्हा, वास्तव स्वरूपाचे सामाजिक अनुभव घेत असतात तेव्हा त्यांची नव्याने येणारी समज यांत विसंगती किंवा संघर्ष निर्माण होतो.  असा संघर्ष वेळोवेळी घडणे केवळ अपरिहार्यच नव्हे, तर ते आवश्यकच असते.  पुन्हा पियाजेच्या विवेचनानुसार, असा प्रत्येक संघर्ष दरवेळी, विद्यार्थ्याला तार्किकतेच्या (वैचारिकतेच्या)वरच्या स्तरांवर घेवून जात असतो.  आणि हे तर शिकण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट असते.

रचनावादी शिक्षणव्यवहारात आपल्या पुढचा प्रश्न असतो तो, या ‘सामाजिक-आकलनविषयक संघर्षा’ला सामोरे जाण्यासाठी, एक, कोणते अनुभव विद्यार्थ्यांना द्यावेत, आणि दोन, या अनुभवांच्या पूर्ततेसाठी वर्गस्तरावर कशातऱ्हेचे वातावरण निर्माण करावे, हा.

या प्रश्नाचे लगेच सुचणारे उत्तर असे की, आवश्यक अशा संघर्षप्रवण अनुभवांसाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढावे व वास्तव जीवनातच त्यांना ते मिळू द्यावेत.  नाहीतरी, भारतातील २००५ सालच्या ‘राष्ट्रीय शिक्षणक्रम आराखड्या’त, ‘वर्गजीवनाचा समाजजीवनाशी संबंध जोडावा’ असे म्हणून ठेवलेच आहे.  परंतु रचनावादी विचारसरणी प्रत्यक्षात उतरवू पाहणारांनी, या शक्यतेची नेटकेपणाने शहानिशा केलेली आढळत नाही; त्यामुळे, शाळांकडून फार अल्प प्रमाणात अशा संधींना विद्यार्थ्यांना भिडू दिले जाते.

या प्रश्नाचे दुसरे एक उत्तर अनेक जाणकारांनी आणि खुद्द पियाजेनेही देवून ठेवले आहे.  जोनासेन यांनी आपल्या एका लेखात (ऑब्जेक्टीविझम वर्सेस कंस्ट्क्टीविझम – डू वी नीड अ फिलॉसॉफीकल पॅराडिम?) प्रत्यक्ष वर्गपातळीवर वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला आहे.  या शिकण्यास सहाय्य करणाऱ्या वातावरणाची, त्यांनी, तीन लक्षणे दिली आहेत.  एक, वास्तव जगाचा संदर्भ लक्षात यावा यासाठी, प्रत्यक्षातील प्रश्नांना भिडावे.  दोन, शिकण्याच्या वातावरणात प्रत्यक्ष जीवनातील नैसर्गिक गुंतागुंत व्यक्त व्हावी; आणि तीन, समाजसंपर्कातून शिकायला, एकत्रित ज्ञाननिर्मितीला सहाय्य व्हावे.  जिथे प्रश्न उपस्थित केले जातात.  समस्या समोर आणल्या जातात आणि जिथे पर्यायी दृष्टिकोण समोर आणले जातात अशा प्रकारचे वातावरण संघर्ष निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरते, असे पियाजेचे विवेचन आहे.

परंतु, आजचा यासंदर्भातील प्रश्न असा आहे, की, जेवढ्या प्रमाणात, मुलांना ‘करून’ शिकण्यासाठी शैक्षणिक साधने, शैक्षणिक उपक्रम तयार केले गेले आहेत, तेवढ्या प्रमाणात, मुलांना सामाजिक-आकलनविषयक संघर्षासाठी नवनवीन आव्हाने निर्माण करण्याचे प्रयत्न होत नाहीत.  काही सुटे सुटे प्रकल्प समाजजीवनाला जोडून, मुलांकडून करवून घेतले जातात.  परंतु विशिष्ट उद्दिष्टे ठेवून दीर्घकालीन नियोजन मात्र केले जात नाही, असाच बऱ्याचदा अनुभव येतो.  त्यामुळे वातावरणाचा हा मुद्दा, निदान व्यवहारात तरी पुरेसा अधोरेखित झालेला नाही.

तंत्रज्ञानाचा वापर

शिक्षणातील आधुनिकता ही सारी तंत्रज्ञानाचा मुक्त स्वीकार आणि वाढता वापर यांतच आहे, असा एक दृढ समज सर्वत्र पसरलेला दिसून येतो.  काही वेळेस हा समाज, शाळांकडून अशा थराला जातो की, शाळेची गुणवत्ता वाढवणे म्हणजे तंत्रज्ञान मुलांच्या हाती देणे, असा गैरसमज घेऊन मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केले जात आहेत.  तंत्रज्ञानच साध्य ठरू लागले आहे.

रचनावादाचे एक अगदी साधे भोळे पण विलक्षण महत्त्वाचे असे एक तत्त्व आहे.  ते असे की, ‘करून शिकण्या’ने मुले प्रभावीपणे शिकतात आणि शिकलेले दीर्घकाल लक्षात ठेवतात.  हे करून शिकणे, शिकणाऱ्याचे वय जेवढे लहान तेवढे अधिक शारीरिक स्तरावरचे असते.  हातांचा, बोटांचा किंवा इतर संवेदनांचा वापर करून मुले शिकतात आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या नैसर्गिकतेचा फायदा मिळतो.  वाढत्या वयाबरोबर ‘करून शिकणे’ याचे अर्थ अधिक सघन होत जातात, अधिक अमूर्त होत जातात आणि मानसस्तरांवर अस्तित्वात येतात.  भाषा हे उच्च दर्जाचे मानससाधन वापरणे, विचार करणे, कल्पना लढवणे या साऱ्या वैयक्तिक पातळीवरील, करून शिकण्याच्या गोष्टी आहेत.  आणि यांना रचनावादी शिक्षणपद्धतीत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.  तंत्रज्ञान येथे उपयोगी नाही.  तंत्रज्ञान हे लहान वयात तर अडथळाच ठरू शकते.

वास्तविक वेगाने येणारा तंत्रज्ञानाचा प्रवाह कुठे अडवायचा, कुठे येऊ द्यायचा आणि कुठे मुक्तपणे वापरायचा याचे नेमके आडाखे बांधण्याचे काम प्रयोगांतून, संशोधनांतून व्हायला हवे आहे.  तंत्रज्ञानाचे साधन म्हणून असणारे महत्त्व अनिवार्य आहे, फक्त विवेकाने निवड आणि आयोजन व्हायला हवे आहे.

बदलता विद्यार्थी

गेल्या पंचवीस-तीस वर्षांचा काळ डोळ्यांसमोर आणला तरी हे लक्षात येईल की, हा तंत्रज्ञान, शास्त्रज्ञान व जीवनशैली यांबाबत वेगाने बदल होत गेले आहेत.  १९९३ साली संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्स हे बाल्यावस्थेत होते.  स्मार्ट फोनचा अजून जन्म व्हायचा होता.  मेंदू संशोधनाचा शिक्षणात वापर फक्त विचारांच्या पातळीवर उदयास आला होता.  दूरशिक्षण टपालाकरवी होत होते; त्यात फार तर ऑडिओ-व्हिडिओ कॉन्फरन्सींग नुकतेच सुरु झाले होते.  सर्वच शाळा वर्तनवादी विचारसरणीच्या अंमलाखाली होत्या; नुकतीच कुठे, काना-कोपऱ्यांत प्रयोगशील शाळांची नव्या दिशेने हात-पाय हालवायला सुरुवात झाली होती.  शिक्षणबदलांचा हा क्रांतिपूर्व काळ होता, आणि इथला विद्यार्थी, सातत्याने ‘बंदी’शाळांत बद्ध होता.

आजचा विद्यार्थी खूपच बदलला आहे, वेगाने बदलतो आहे.  हा बदल प्रामुख्याने दोन स्तरांवरचा आहे.  एकम विविध शास्त्रांच्या संशोधनांतून विद्यार्थी पार वेगळा दिसू लागला आहे, या वेगळेपणाचा एक स्तर.   आणि दोन, विद्यार्थी उद्या ज्या वातावरणात जगणार आहे त्या वातावरणातील त्याच्या वैयक्तिक व सामाजिक गरजा वेगळ्या असणार आहेत, त्या अपेक्षित गरजांचा स्तर.  विद्यार्थी कसा असतो, त्यामधील मूल निसर्गतः शारीरिक, भावनिक, बौद्धिक नी सामाजिकदृष्ट्या वाढते कसे, वेगवेगळ्या वयाच्या पातळीवर शिकते कसे याची बरीचशी माहिती आता मिळू लागली आहे; त्यामुळे, ते पूर्वी मानले जात असल्याप्रमाणे, आज्ञाधारक असणार नाही तर स्वतंत्र विचारधारक असणार आहे, हे आता आपल्याला कळू लागले आहे.  प्रत्येक व्यक्ती उपजत इतरांपेक्षा काही वेगळाच बुद्धिमत्तांचा पट घेऊन जन्माला आली आहे.  साहजिकच तिचा शिकण्याचा कल, वृत्ती, बुद्धी, आवड, शिकण्याची शैली आणि गरज वेगवेगळी असते, ही माहिती मिळू लागल्यापासूनच शिक्षण हे अधिक व्यक्तिनिष्ठ बनू लागले आहे.  हॉवर्ड गार्डनर यांनी म्हटल्याप्रमाणे, (इंटलिजन्स रीफ्रेम्ड), आपण आता वैश्विक गावात जगत आहोत; आणि इथे वेगाने बदल नी इतर हजारोंबरोबर सततचा संपर्क घडून येत आहे.  जितके जास्त अनुभव मिळतील, जितके अधिक संपर्क माध्यमांच्या प्रकाशात वावरू, जेवढ्या अधिक लोकांच्या संपर्कात येऊ, तेवढे अधिक आपापसांतील फरक असणार आहेत.  वैविध्य हेच या शतकाचे वैशिष्ट्य असणार आहे.  या वैविध्याला शिक्षणातून भिडणे हे आपल्यापुढचे एक आव्हान असणार आहे.  विकसनशील तंत्रज्ञान येथे उपयोगी ठरणार आहे.  विकसनशील शास्त्रज्ञान मात्र गुंतागुंत वाढवणार आहे.

उद्याचा विद्यार्थी ज्या विश्वात जगणार आहे ते विश्व सातत्याने आतून बदलत जाणारे, असे विश्व असणार आहे.  या अंतर्गत बदलांना व बदलांच्या वेगाला सतत सामोरे जाण्याची ताकद त्याला आजच्या शिक्षणाने प्राप्त करून द्यायला हवी.  बदलांना भिडण्याची वैचारिक लवचिकता, गुंतागुंतीच्या जगातील प्रश्न सोडविताना लागणारी भावनिक स्थिरता, वाढत्या समाजसंपर्कात वावरण्यासाठी लागणारी सहिष्णुता, स्वत: सातत्याने शिकत राहण्याची क्षमता आणि निर्णय घेण्यासाठी लागेल अशी स्वतंत्रता व वैयक्तिकता या साऱ्या गोष्टी देणारे नवे शिक्षण- नव्हे, नवनवे शिक्षण कसे निर्माण करावे, हे आपल्या पुढचे सार्वजनिक आव्हान आहे.

बदलत्या रचनावादी शिक्षणात अशी आव्हाने पेलण्याची शक्यता व क्षमता असेल, असे माझे भाकित आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)