बालशिक्षणाचे नवे वळण

आजूबाजूच्या परिस्थितीचा, लहान मुलांच्या मेंदूंमधील चेतापेशीजालिकांवर काय परिणाम होतो हे एक अलीकडचे, महत्त्वाचे संशोधनक्षेत्र झाले आहे. चेताशास्त्रात व मानसशास्त्रात, अनेक संशोधने, मुलांवरील अनेक संशोधने, त्यांवर आधारित शैक्षणिक पर्यवसने यांवर लेख व पुस्तके प्रकाशित होत आहेत.

दुसरीकडे, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती वेगळीच आहे. आपल्याकडे, बालसंगोपन, यांच्याशी संबंधित असे अभ्यासविभाग सर्व विद्यापीठांमधून नाहीतच विद्यापीठाच्या शिक्षणविभागांतही या विषयाला स्थान नाही. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या पदव्या, पदविकांच्या विषयांत, ‘बालशिक्षणशास्त्र’ या शिक्षणातील पायाभूत विषयाचा समावेशच नाही. त्याचबरोबर, सध्याच्या काळात शिक्षणाला आधारभूत ठरत असलेल्या ‘मेंदूआधारित शिक्षण’ या विषयाचा अंतर्भावही बीएड्-डीएड्च्या अभ्यासक्रमांत नसल्यामुळे, या शिक्षकांना प्राथमिक काय किंवा माध्यमिक काय, दोन्हींमध्ये, कळीची भूमिका घेऊ शकेल अशा, मज्जामानसशास्त्राची साधी ओळखही होत नाही. मूल समजल्याशिवाय मुलाचे शिक्षण करता येणार नाही, हे विद्यापीठांना आणि निदान त्यांमधील शिक्षणविभागांना त्वरेने कळण्याची गरज आहे. आणखी एक गोष्ट अशी की, मज्जामानसशास्त्रीय संशोधनांचा एक उपयोग असा आहे की, आज ज्या पद्धतींचा अंगीकार आणि वापर आपण विद्यार्थ्यांना वर्गांमधून करतो आहोत, त्यांच्याच योग्या-योग्यतेची शहानिशा करणे यामुळे शक्य होणार आहे. अशी शहानिशा होणे, हे शिक्षणात बदल होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

बालशिक्षणशास्त्र हे, समाजात सार्वत्रिकरित्या उपयोगाचे आहे. घर हे मुले वाढण्याचे आणि विकसित होण्याचे स्थान असल्यामुळे, आई-वडील, घरांतील अन्य प्रौढ या मंडळींना आपल्या घरांतील बालक समजावून घेऊन, एकूण वागणूक ठरविण्यास, बालशिक्षणशास्त्र उपयोगी आहे. त्यामुळे, या शास्त्राचा सर्वच घरांशी संबंध पोचतो, असे विधान अतिशयोक्त ठरणार नाही.

मुले घरात शिकतात तशी ती शाळांमधूनही शिकतात. तेथील व्यवहारांत असणाऱ्या प्रौढांनाही मूल आणि त्याच्या वयोमानानुसार असणाऱ्या बौद्धिक, भावनिक गरजा समजावून घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही स्तरावरील शिक्षकांना बालकांचे मज्जामानसशास्त्र समजलेले असणे, आवश्यक आहे.

आपल्या लोकशाही राष्ट्रातही, शासनच प्रामुख्याने सर्व स्तरांवरील शिक्षणाची धोरणे ठरवीत असते. अशावेळी, शिक्षणशास्त्रात संशोधने होऊन फार मोठे होत असलेले बदल, सरकारी मंडळींना माहीत असणे व त्यांचा, धोरणे ठरविताना विचार केला जाणे आवश्यक असते. सरकार सामान्यतः स्थिरताप्रिय असले तरी, शिक्षणाचे खाते प्रवाही असावे लागते; कारण शिक्षणच प्रवाही असावे लागते. आजचे शिक्षण हे कालचे असून चालत नाही तर ते उद्यासाठी असते. शासकांनाही प्रवाही शिक्षणाच्या धोरणांसाठी, विविध शिक्षणप्रवाहांची वाजवी ओळख असायला हवी. बालकांचे मज्जा-मानसशास्त्राचे प्रशिक्षण धोरणे ठरविणाऱ्या शासकांनाही मिळण्याची गरज आहे.

बालशिक्षणाचे नवे शास्त्र

गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये, मेंदूविषयक संशोधनांतून मेंदूच्या रचनेची व कार्यपद्धतीची बरीचशी माहिती, आजच्या जगाला उपलब्ध झाली आहे. यातून मुलांना मेंदूविकासाची वाटचाल, त्यात असणारे खड्डेखळगे, घ्यावयाची काळजी आणि मेंदूपोषण व मेंदूघातक प्रथा, वातावरण, वागणूक म्हणजे काय हे कळू लागले आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये मानसशास्त्रानेही बालकांविषयीचे नवे दृष्टीकोण, बालकांच्या विकासाविषयीचे काही नवे विचार प्रसृत केले आहेतच. या दोनही शास्त्रांच्या प्रगतींतून, मूल निसर्गतः असते कसे, टप्प्या-टप्प्यांनी ते निसर्गतः वाढते कसे आणि स्वतःच्या (मेंदूच्या) नैसर्गिक प्रक्रियांनी ते शिकते कसे, यांविषयीची नवी जाण, संबंधितांना येऊ लागली आहे. मुलांना कोणत्याही गोष्टींचे आकलन कसे होते? मुले, आपल्या ज्ञानाची रचना, आपली आपण कशी करतात? मुलांना, एक किंवा अनेक भाषा अवगत कशा होतात? ज्या मुलांना शिक्षणात विविध स्तरांवर, विविध प्रकारचे अडथळे येतात, ते का येतात? अशा कितीतरी शिक्षणसंबंधित प्रश्नांची नव्या शास्त्रांनुसार नवी उत्तरे आता मिळू लागली आहेत. कोणत्याही प्रकारे मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांना, या सर्व बाबी लक्षात घेऊनच आता आपला शिक्षणव्यवहार चालवायला हवा.

या अलीकडच्या शास्त्राभ्यासाने आणखीही काही शैक्षणिक बाबींवर ठामपणाने बोट ठेवले आहे. उदाहरणार्थ, लहान वयांत, शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास हातात हात घालून चालू असतो, म्हणजे, विशिष्ट शारीरिक परिपक्वता आल्याशिवाय, विशिष्ट बौद्धिक क्रिया होऊ शकत नाहीत, किंवा विशिष्ट शारीरिक परिपक्वतेला अनुसरून विशिष्ट बौद्धिक क्षमता आल्याशिवाय राहत नाहीत; भाषा आत्मसात होण्याचा विशिष्ट असा एक संवेदनशील असा कालावधी असतो, आणि तो प्रयत्नांविना वाया गेला तर पुढे भाषा येणे कठीण व वेळखाऊ असते; किंवा, मुलांनी आत्मसात केलेली पहिली भाषा ही त्यांची आचार-विचारांची आणि ज्ञानप्राप्तीची प्रभावी भाषा असते; भावना हा बालकाच्या शिक्षणात अडथळा निर्माण करणारा अथवा शिकायला सहाय्यभूत होणारा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून शिक्षणात, शिकणाऱ्यांच्या भावनेचा विचार व्हावा लागतो; बुद्धिमत्ता ही एक, आनुवंशिक आणि, अपरिवर्तनीय अशी गोष्ट नसून, विविध लोकांना अनेक तऱ्हेच्या बुद्धिमत्ता उपजतच प्राप्त होतात, त्या त्यांना वाढवताही येतात; बुध्यंक ही बदलली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे शाळेत कमी-अधिक हुशारीचे विद्यार्थी नसतात तर, वेगवेगळ्या हुशारीचे सर्व विद्यार्थी असतात व त्यांच्यात समानता मानली पाहिजे; शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे, हीच प्राथमिक अट असून, त्यासाठी पोषक अन्न व पाणी यांचा विचार प्रामुख्याने व्हावा लागतो; मेंदू हा माणसाच्या शिकण्याचा अवयव असून मेंदूचे आरोग्य महत्त्वाचे ठरते व त्यासाठी मेंदूचे सातत्याने पोषण होत राहणे अगत्याचे असते. अशा कितीतरी गोष्टींची जाण शास्त्रीय संशोधकांनी आपल्याला नव्याने दिली आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करून मुलांचे शिक्षण चालू ठेवणे ही बालकांवरच अन्याय करणारी अशी गोष्ट असणार आहे.

नव्या दिशेने बालशिक्षणाचा विचार होण्यासाठी, केन आणि केन यांनी आपल्या ‘मेकिंग कनेक्शन्स : टिचिंग अँड द ह्युमन ब्रेन; या ग्रंथात दिलेले मेंदूसंशोधनांचे सामान्य निष्कर्ष आपल्याला उपयोगी पडतील. एक, सुरुवातीचा काळ हा अगदी निर्णायक स्वरूपाचा ठरतो. दोन, (शारीरिक व बौद्धिक) परिपक्वता आणि शिकणे या दोन गोष्टी परस्परांपासून वेगळ्या करता येणार नाहीत. तीन, आजूबाजूच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष मेंदूवरच परिणाम होत असतो, आणि चार, मुलामुलांच्यात (प्रगतीचा) कालावधी खूपच वेगवेगळा असू शकतो. या गोष्टी घरी पालकांनी आणि शाळांतून शिक्षक व संस्थाचालकांनी लक्षात घेऊनच, आपली शिकविण्याची व शाळाव्यवस्थेची धोरणे ठरवायला हवीत.

खरोखरच, शिक्षक व पालक हे मुलांच्या मेंदूचे ‘मालक’ नसून ते त्यांना योग्य आकार देणारे, त्यासाठी मेंदू विकासाची तत्त्वे आचरणात आणणारे ‘अभियंते’ आहेत, असे म्हणता येईल. मुलांवर आपल्या कल्पना लादण्यापेक्षा त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे, मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्यांना उद्युक्त करणारे, मुलांना आज्ञाधारक बनविण्यापेक्षा त्यांना ज्ञानधारक बनण्याचे स्वातंत्र्य देणारे आणि मुलांच्या वागण्याची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या मेंदूची काळजी घेणारे असे शिक्षक आणि पालक हेच खरे बालशिक्षणाचे शास्त्र पाळणारे सहाय्यक होऊ शकतील असे वाटते!

You may also like...

7 Responses

 1. Kalpana says:

  Very informative article. Need to learn more about brain

 2. Deshmukh R k. says:

  Sir khup chhan.

 3. खूप छान , या माहितीने आमच्या संकल्पन्नात बराच फरक पडेल

 4. Harish says:

  सर आम्हाला खूप उपयोगी असे Article

 5. बालकांसाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींना उपयुक्त आणि दिशा दाखवणारा लेख. आपले उच्च शिक्षण या बाबतीत काही करत नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)