पालकत्वाचे शिक्षण पालकांनी स्वतःचे स्वतःच केले पाहिजे!

मुले आणि त्यांचे आई-वडील हा एक नैसर्गिक संबंध असतो. नैसर्गिकतेने मूल जन्माला येते आणि संबंधित स्त्री-पुरुषाचे रूपांतर ‘आई-वडील’ या नात्यात होते. आपल्या मुला-मुलींचे लालन, पालन व पोषण करण्याची व्यावहारिक जबाबदारी मात्र निसर्ग आई-वडिलांच्या पदरात टाकतो. हे कसे करावे, याविषयीचे काहीसे ज्ञान आजूबाजूचा समाजाकडून येते; आणि मुले आपापल्या कुटुंबात वाढू लागतात.

मुलांचा जन्म ही जशी एक नैसर्गिक घटना आहे तशीच मुला-मुलींची होत जाणारी वाढ ही देखील निसर्गनियमांनी ठरवून दिलेली असते. मुलांची होणारी शारीरिक वाढ, त्यांच्या विकसित होत जाणाऱ्या क्षमता तसेच त्यांना हळूहळू येत जाणारी शारीरिक कौशल्ये व भाषा, या साऱ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातात, ही सर्वच आई-वडिलांना माहीत असलेली, त्यांच्या नित्य ओळखीची अशी बाब आहे. सहजपणे घडत जाणाऱ्या या बाबी सर्वांच्या परिचयाच्या असतात.

या सर्व नैसर्गिक वाढीच्या एका विशिष्ट टप्प्याला मूल समाजाने ठरवून दिलेल्या अशा ‘शिकण्या’च्या वयात पदार्पण करते तेव्हा, मुलाचे रूपांतर ‘विद्यार्थ्यात’ होते आणि आई-वडिलांचे रूपांतर ‘पालकां’मध्ये होते. आणि मग आपल्या मुलांची बौद्धिक प्रगती, बौद्धिक वाढ हे विषय पालकांना जवळिकेचे व चिंतेचे वाटू लागतात.

ह्या, मुलांच्या औपचारिक (म्हणजे, ज्याच्या आशय आणि पद्धती समाजाने निर्धारित केलेल्या आहेत अशा ) शिक्षणाच्या टप्प्याला पालक अधिक जागरूक होतात. मुलांचे लालन, पालन, पोषण यांच्याबरोबर शिक्षणाची नवीन जबाबदारी पालकांवर येऊन पडते; आणि मग आपल्याला मुलांकडे ‘विद्यार्थ्यांच्या’ अंगाने ते पाहू लागतात. चांगले शिक्षण, चांगली शाळा, शिक्षणाचे माध्यम, शाळेचे शुल्क, गणवेश, क्रमिक पुस्तके, शाळेत नेण्या-आणण्याच्या व्यवस्था, शाळेतील स्पर्धा,परीक्षा, निकाल, हुशारपण असे विषय पालकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. याचवेळी आणखीही दोन गोष्टी, बऱ्याचदा पालकांच्या नकळतच, पालकांच्या मनाचा ताबा घेऊ लागतात. एक म्हणजे, आपला पाल्य हा इतर मुलांच्या तुलनेने आजमावण्याची सवय त्यांना लागते. म्हणजे आता त्यांना आपला मुलगा नुसता हुशार नको असतो, तर तो इतरांच्या तुलनेने, इतर मुलांपेक्षा अधिक हुशार हवा असतो. दुसरे म्हणजे, आत्ताच्या पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्याची स्वप्ने पडू लागतात; आणि पाल्याबाबतच्या अपेक्षांची पालवी त्यांच्या मनात फुटू लागते. ह्या दोन्हींतून पालकांची आपल्या पाल्याकडे पाहण्याची दृष्टी घडू लागते. मुले ही आई-वडिलांच्या अशा आकांशांची प्रतीके बनू लागतात. आणि हे कसे सारे सहजपणाने घडून येते. पालकांनी ठरविलेल्या दिशेने मुलांची प्रगती व्हावी यासाठी केवळ पालकांची जंगी धडपड सुरू होते. ठराविक दिशेने मुलांना नेण्याची जबाबदारी पालकांना घेऊन लागतात, आणि साहजिकच स्वतःला ‘जबाबदार पालक’ मानतात.

इथे खरी मुलांची ‘विद्यार्थी’ म्हणून होणारी परवड सुरु होते. जोवर मुले लहान असतात, आई-वडिलांवरच खूपशी अवलंबून असतात, तोवर पालक व पाल्य यांच्या संबंधात फारसे वितुष्ट येत नाही परंतु मुले बाल्यावस्थेतून बाहेर पडून कुमार वयात शिरतात, पुढे युवावस्थेत पदार्पण करतात तेव्हा, असे वितुष्ट यायला सुरवात होते. मुले जेव्हा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःच्या मनाचा ताबा स्वतःकडे घेऊ लागतात, त्यांना स्वतंत्र विचाराची पालवी फुटू लागते, आणि स्वतःचे हित स्वतः पाहण्याची ओढ निर्माण होते. याच काळात मुलांना उपजत असलेल्या बुद्धिमत्ता (ज्या पुढे जाऊन मुलांच्या पेशा ठरविणार असतात.) त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागतात. मुलांचा कल, मुलांची आवड आणि यांची दैनंदिन शिक्षणाची सांगड घालण्याचा  प्रयत्न मुले प्रामाणिकपणे करू लागतात. जिथे ही सांगड नीटपणे घातली जाते, तिथे मुले जुळवून घेतात. पण जिथे ही सांगड घातली जात नाही तिथे मुले बंड करतात, अथवा त्यांच्यापासून पळ तरी काढतात. पालकासाठी पेचाचे प्रसंग उद्भवतात.

कुटुंबातील शैक्षणिक वातावरणाचे हे सर्वसामान्य चित्र आहे. जागरूक, जबाबदार पालक आपापल्या कुटुंबापुरते हे चित्र बदलू शकतात. त्यासाठी त्यांना जरा वेगळ्या वाटेने जावे लागेल. त्यासाठी काही वेगळा विचार करावा लागेल; वेळप्रसंगी काही शिकावेही लागेल. त्यांना हे समजावून घ्यावे लागेल की, आई-वडील होणे ही नैसर्गिक घटना आहे तर पालक होणे ही एक सामाजिक घटना आहे. मुले शालेय शिक्षण घेऊ लागतात तेव्हा पालकांना दोन गोष्टी शिकाव्या लागतात. एक, शिकणारे मूलअसते कसे? ते शिकते कसे? शिकताना त्यांच्या बौद्धिक गरजा काय असतात? भावनिक गरजा काय असतात? वाढते वय आणि वाढते शिक्षण यांचा परस्पर संबंध आणि त्यातच टप्प्याटप्प्याने होत जाणारा स्वभावातील बदल, यांची नेटकी कल्पना पालकांना असायला हवी. थोडक्यात असे की, पालकांना, शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर असणारे मूल समजावून घायला हवे. दुसरे असे की, मुलांना कोणते शिक्षण कोणत्या माध्यमातून केव्हा कसे आणि का घ्यायचे असते? मुलांच्या उपजत बुद्धिमत्तांना, त्यांना मध्यवर्ती स्थान देऊन, शिक्षणात त्याचे ज्ञान, त्याची कौशल्ये, कशी मिळतील? कुठे मिळतील? आपल्या पाल्याचे शिक्षण इतर मुलांपेक्षा काही वेगळे असेल काय? त्यातून त्याचा पेशा कसा ठरेल? समाजातील यशस्वी पेशांचे शिक्षण मुलांना घ्यायचे की, मूल यशस्वी ठरेल अशा पेशाचे शिक्षण मुलांना द्यायचे? या आणि अशा कित्येक प्रश्नांच्या वाजवी उत्तरांसाठी पालकांनी शिक्षण घेणे, हे खास शिक्षण घेणे गरजेचे आहे. तशा व्यवस्था म्हणजे पालक शिक्षणाची केंद्र अजूनही आपल्याला समाजात नाहीत. या व्यवस्था जोवर निर्माण होत नाहीत तोवर आपल्या शिक्षणाची जबाबदारी पालकांनाच  घ्यावी स्वतःच लागेल.

आपल्या मुलांना, त्यांच्या शिक्षणात खूप मदत व्हावी असे जर पालकांना वाटत असेल तर, त्यांचा पाल्य कोणत्याही वयाचा आणि शिक्षणातील कोणत्याही पायरीवर (प्राथमिक शाळेत, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय इ.) असो, त्याच्या शिक्षणाबाबत काही मूलभूत गोष्टी पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात, त्या अशा:

 • सर्वच मुले आपली आपण शिकू शकतात; आणि मुख्य म्हणजे शिकायला उत्सुक असतात. त्यामुळे शिकण्याच्या संधींच्या सागरात खुशाल मुलांना यथेच्छ पोहू द्यावे. असे केल्याने मुले भरपूर शिकतात; आणि मुख्य म्हणजे स्वतःहून शिकायला शिकतात. याचा त्यांना कुठल्याही क्षेत्रात आणि पुढील आयुष्यात उपयोग होतो.
 • सर्वच मुलांना सतत नवे नवे शिकायला आणि काहीतरी शोध घेऊन शिकायला आवडते. आपल्या शाळा, आपली महाविद्यालये विशिष्ट अभ्यासक्रम व त्यावरील लेखी परीक्षा या जंजाळात अडकून राहिल्यामुळे, अशा शोधांच्या नित्य नूतन संधी त्या मुलांना देऊ शकत नाहीत. पालक, नेमकी इथे मुलांना चांगली मदत करू शकतात. शाळेबाहेरचे अफाट विश्व म्हणजे विराट प्रमाणावरील शोधसंधींचा खजिनाच आहे. आपल्या मुलांना शाळेबाहेरच्या शिक्षणसंधी घ्यायला प्रवृत्त करता येते, नव्हे, प्रयत्नपूर्वक केले पाहिजे.
 • अनुभवांतून शिकणे, नवे नवे विविधांगी अनुभव घेऊन शिकणे, हीच खरी तर शिकण्याची एकमेव पद्धत आहे. शाळा-महाविद्यालये आपल्या मर्यादित व बंदिस्त चौकटीत, विविध अनुभवांची धमाल उडवून मुलांचे शिक्षण प्रभावी करणारे काम करू शकत नाहीत. पण शाळा महाविद्यालये पुरवू शकत नाहीत अशा कितीतरी संधी घरे पुरवू शकतात. स्वतःचे घर-कुटुंब हे शिक्षणाचे सर्वात चांगले व संपन्न असे प्रभावी केंद्र असू शकते. पालकांनी ते कसे असू शकते. याचा स्वतःच शोध घ्यायला हवा. शाळांतील शिक्षणाला घरातील अनुभवांधारितशिक्षणाची जोड द्यायला हवी.
 • सामान्यतः आपण असे मानतो की, मुलांचे शिक्षण हे केवळ बौद्धिक काम आहे. त्यामुळे, मुलांच्या बुद्धिची वाढ, बुद्धीवाढीसाठी वेगवेगळे उपाय किंवा बुध्यंकाचा अंदाज घेणे अशा अनेक गोष्टी पालकांच्या मनात व व्यवहारात असतात. मुख्य समजावून घायची गोष्ट अशी की, बुद्धी ही एकटी नसते. बुद्धी आणि भावना यांची कायमच निसर्गाने बांधून ठेवलेली जोडगोळी ती असते. त्यामुळे बुद्धीबरोबर आणि बुद्धिविकासासाठीही मुलांच्या भावनांची नेहमीच कदर राखावी लागते. मुले प्रसन्न भावनेने शिकत असतील तर ती एकाग्र होऊन शिकतात. आणि चांगले मन लावून शिकायला मिळाले तर आनंदी होतात. त्यांच्या बुद्धीचा विकास आपसूकच व वेगाने होतो. आपण आपल्या मुलांना प्रसन्न, समाधानी, आनंदी ठेवण्याचा विचार कितपत करतो? केवळ ‘अभ्यास’ या आग्रहापोटी त्यांची आनंद उभारी तर आपण मारत नाही ना?
 • भावनांचा विचार केवळ शिकण्याशी संबंधित नाही, तो अधिक करून आपल्या जीवनाशीच संबंधित असतो. मुलांना दुसऱ्यांच्या भावना ओळखून, समजावून घेऊनच आयुष्यभर समाजात वावरायचे असते. त्यावरच समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. तसेच, व्यवहारात वेळोवेळी आपल्याला मन आवरून वावरावे लागते. अशावेळी, स्वतःच्या भाव-भावनांचे नियंत्रण करण्याचे कौशल्य आपल्या अंगी असणे गरजेचे असते. परंतु या महत्त्वाच्या गोष्टींचे शिक्षण शाळा-महाविद्यालये त्यांच्या मर्यादांमुळे देऊ शकत नाहीत; त्यामुळे ही जबाबदारी सुद्धा पालकांनी आपापल्या कुटुंबामध्ये घ्यायला हवी. कशी घ्यायची? पालकांनी स्वतःच शोध घ्यायला नको का?

सूज्ञ पालक हे नेहमीच, आपल्या पाल्यांच्या केवळ परीक्षांतील यशाचाच विचार करून थांबत नाहीत. ते आपल्या पाल्यांच्या अधिक सक्षम, अधिक संपन्न, अधिक समाजोपयोगी अशा जीवनाचा विचार करतात.

शिकण्याची प्रक्रिया ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असते. तिच्यासाठी सक्षम करणे, म्हणजे मुलांचे शिक्षण करणे होय! तसे आपण करू शकलो तर आपण आपले पालकत्व पूर्णांशाने निभावले असे म्हणता येईल !

You may also like...

5 Responses

 1. जगदीश इंदलकर says:

  खूप छान आणि प्रेरणादायी

 2. Deolalkar says:

  उपयुक्त मार्ग दर्शन !!

 3. पालक तसेच समाजातील इतर घटकांसाठी उपयुक्त लेख. पालकांनी आपले छोटे-छोटे गट करून या लेखात सुचवल्याप्रमाणे कृती केल्या तर मुलांना फार चांगले वातावरण मिळेल.

 4. Katkade B.U says:

  प्रेरणादायी लेख
  कायमस्वरूपी शिक्षण
  चिरंतन शिक्षण

 5. Katkade B.U says:

  प्रेरणादायी शिक्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)